नवीन लेखन...

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम् ।।

अष्टलक्ष्मीस्तोत्रम् हे स्तोत्र १९७० च्या आसपास श्री श्रीनिवास वरदाचारियर स्वामी यांनी रचलेले आहे. या स्तोत्रात लक्ष्मीची विविध आठ रूपे वर्णन केली आहेत. त्याची रचना दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) (२३अक्षरे) या वृत्तात केली आहे. तथापि ती काही श्लोकात थोडीशी विस्कळित वाटते. काही ओळीत अक्षरांची संख्या कमी जास्त झालेली तसेच लघु-गुरु क्रमही बदललेला दिसतो. शब्दांची आणि कल्पनांची पुनरावृत्ती जाणवते. असे वाटते की हे सर्व श्लोक वेगवेगळ्या वेळी एक एक रचून नंतर ते एका स्तोत्राच्या स्चरूपात गठित केले असावेत.
अष्टलक्ष्मी मंदिरे मुख्यत्त्वे दक्षिण भारतात व परदेशातही अनेक ठिकाणी आहेत.


आदिलक्ष्मी
सुमनसवन्दित सुन्दरि माधवि, चन्द्रसहोदरि हेममये
मुनिगणमण्डितमोक्षप्रदायिनि, मञ्जुळभाषिणि वेदनुते ।
पङ्कजवासिनि देवसुपूजित, सद्गुणवर्षिणि शान्तियुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, आदिलक्ष्मि परिपालय  माम् ।। १ ।।

मराठी- सज्जन लोक जिला नमन करतात, अशा रूपमती, माधवाची पत्नी, चंद्राची बहीण असलेल्या, सुवर्णमयी, मुनिजनांचे जिला कोंदण लाभते, जी (भक्तांना) मोक्ष देते, जिचे बोलणे मृदु आणि सौम्य आहे, वेद जिची स्तुती करतात, जिचे वास्तव्य कमळात आहे, देवगण जिची पूजा करतात, जी (आपल्या भक्तांवर) सद्गुणांचा पाऊस पाडते, शांतीने परिपूर्ण असणार्‍या मधुसूदनाच्या भार्ये आदिलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

सुजन प्रणाम, सुरेख रमेस, शशीभगिनीस, सदा करिती
कनकमयी, मुनि-कोंदण, मुक्ति प्रदा, मृदु बोल, श्रुती स्तविती ।
कमलनिवास, करी बरसात गुणां सकलांप्रति, शांत अती
हरिसहचारिणि आदिसुधे जय हो तव राख मला जगती  ॥०१॥  (सुधा – लक्ष्मी)


धान्यलक्ष्मी
अहिकलिकल्मषनाशिनि कामिनि, वैदिकरूपिणि वेदमये
क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि, मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।
मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, धान्यलक्ष्मि परिपालय  माम् ।। २ ।।

मराठी- हे कलियुगातील दोषांचा नाश करणार्‍या, जी वेदस्वरूप आहे, जिने सर्व वेद व्यापून टाकले आहेत, जी क्षीरसागरातून बाहेर आली आहे, जिचे रूप मंगल आहे आणि जी सर्वांचे मंगल करते, जिचा निवास मंत्रात आहे आणि मंत्रच जिची प्रशंसा करतात जी कमळात रहाते आणि जिच्या पायी सर्व देव आश्रय घेतात अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू  माझे पालन कर.

कलियुग दोष निवारक, वेदस्वरूप, श्रुतीमय, पावन ती
पयधिसुते, घर अम्बुज, मंत्र, तुझीच ऋचा करितात स्तुती ।
सुरगण आश्रय घेत पदी तव, पावन करण्या सक्षम ती
हरिसहचारिणि धान्यसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०२॥


धैर्यलक्ष्मी
जयवरवर्णिनि वैष्णवि भार्गवि, मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये
सुरगणपूजित शीघ्रफलप्रद, ज्ञानविकासिनि शास्त्रनुते ।
भवभयहारिणि पापविमोचनि, साधुजनाश्रितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धैर्यलक्ष्मि परिपालय  माम् ।। ३ ।।

मराठी- जी (भक्तांना) विजयाचे वरदान देते, जी विष्णूची (भार्या) व भ्रुगु ऋषींची मुलगी आहे, जी मंत्रस्वरूप आणि मंत्रमय आहे, देवगण जिची पूजा करतात, जी केल्या कृत्यांचे तात्काळ फळ देते, जी सर्वांचे ज्ञान वाढविते, (षट) शास्त्रे जिचे गुणगान करतात, सांसारिक जगताची भीती जी हरण करते, संतमहात्मे जिच्या चरणी आश्रय घेतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू  माझे पालन कर.

भृगुतनया, वर दे विजया, करिती सुर पूजन, लाभ तयां 
चटकन दे, हरते भवभीति, नि वाटत ज्ञान मुकुंदप्रिया । 
मुनिजन आश्रय घेत पदी, गुणगान सहा नित जे करिती (सहा- षट शास्त्रे)  
हरिसहचारिणि धैर्यसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०३॥

टीप- शास्त्र या संज्ञेखाली वेदान्त, सांख्य, न्याय, योग, मीमांसा, व्याकरण, छन्द, निरुक्त, ज्योतिष  अशा अनेक विषयांचा समावेश केला जातो. त्यांचा साधारणतः सहा शास्त्रे असा उल्लेख करण्यात येतो.


गजलक्ष्मी
जयजय दुर्गतिनाशिनि कामिनि, सर्वफलप्रद शास्त्रमये
रथगजतुरगपदादिसमावृत, परिजनमण्डितलोकनुते ।
हरिहर-ब्रह्म-सुपूजितसेवित, तापनिवारिणि पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, गजलक्ष्मि परिपालय माम् ।। ४ ।।

मराठी- सर्व प्रकारच्या हाल अपेष्टांचा नाश करणारी, सर्व इच्छांची पूर्तता करणारी, रथ, हत्ती, घोडे व पायदळ यांनी सर्व बाजूंनी वेढलेली, (साही) शास्त्रांना व्यापून राहिलेली, सेवकांच्या कोंदणात (गराड्यात) असणारी, जनसामान्य तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेशही जिची पूजा करतात, जी सर्व कष्ट समाप्त करते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये गजलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू  माझे पालन कर.

सकळ व्यथा हरते, पुरवीत मनोरथ, व्यापुन वेद-स्मृती 
रथ-हय-कुंजर पायदळासह, सेवक संघ सवे असती । (हय- घोडा, कुंजर- हत्ती)    
शिव-चतुरानन-विष्णु-प्रजाजन पूजित, कष्ट तसे सरती 
हरिसहचारिणि हस्तिसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०४॥ (हस्ती – हत्ती)


सन्तानलक्ष्मी
अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि, रागविवर्धिनि ज्ञानमये
गुणगणवारिधि लोकहितैषिणि, स्वरसप्तभूषितगाननुते ।
सकलसुरासुरदेवमुनीश्वरमानववन्दितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, सन्ततिलक्ष्मी पालय माम् ।। ५ ।।

मराठी- जिचे वाहन सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारा जिचा महिमा अधिकच वाढतो, जी मूर्तिमंत ज्ञानच आहे, जी विविध गुणांचा सागर आहे, सर्वसामान्य जनांचे जी हितच करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य प्राणी जिची पूजा करतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू  माझे पालन कर.

विविध स्वरावलि वाढविती महिमा, वलयांकित हात असे
सकल जगा भुलवी, घुबडा निवडून, खरोखर ज्ञान दिसे ।
हित सकलां, गुणसागर, दैत्य मुनी सुर मानवही नमती
हरिसहचारिणि वंशसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०५॥

टीप- येथे लक्ष्मीचा उल्लेख ‘अहि-खग-वाहिनी’ म्हणजे सापाला पकडून उडणारा पक्षी (गरुड) जिचे वाहन आहे असा असला तरी, घुबड हेच तिचे वाहन आहे अशी परंपरागत मान्यता आहे व उल्लेखही आहेत.


विजयलक्ष्मी
जय कमलासनि सद्गतिदायिनि, ज्ञानविकासिनि गानमये
अनुदिनमर्चितकुङ्कुमधूसर-भूषित वासित वाद्यनुते ।
कनकधरास्तुति वैभव वन्दित, शङ्कर देशिक मान्य पदे
जयजय हे मधुसूदन कामिनि, विजयलक्ष्मि परिपालय माम् ।। ६ ।।

मराठी- हे कमळात निवास करणार्‍या, (आपल्या भक्तांच्या) (ब्रह्म) ज्ञानाचा विकास करून त्यांना सद्गति देणार्‍या, गायन स्वरूप असणार्‍या, दररोज पूजा केली गेल्याने सर्वांगावर पसरलेल्या कुंकवाने सुशोभित झालेल्या, सुमधुर वाद्ये वाजवून जिची पूजा केली जाते, श्रीमद शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्रात जिच्या पावलांची प्रशंसा केली आहे, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विजयलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

कुमुद निकेतन, गानस्वरूप, नि ज्ञानविकास करून गती
सकलजनां, तनु पिंजर पूजित, वाद्य स्वरे मधु गुंजत ती ।
कनकधार स्तवनी गुरु शंकर वंदुन पाय स्तुती करिती
हरिसहचारिणि सिद्धिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०६॥


विद्यालक्ष्मी
प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि, शोकविनाशिनि रत्नमये
मणिमयभूषित कर्णविभूषण, शान्तिसमावृत हास्यमुखे ।
नवनिधिदायिनि कलिमलहारिणि, कामित फलप्रद हस्तयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, विद्यालक्ष्मि परिपालय माम् ।। ७ ।।

मराठी- देवतांची देवी असलेल्या, भारती, भृगुकन्या भार्गवी, दुःखांचा नाश करणार्‍या, जिला तर्‍हे तर्‍हेची रत्ने शोभा देतात, जिच्या कर्णभूषणांना रत्ने जडवलेली आहेत, जिचा चेहर्‍यावर शांतता पसरलेली असून ती हसतमुख आहे, जी आपल्या भक्तांना नवनिधी प्रदान करते, कलियुगातील दोष हरण करते, आपल्या वरद हाताने इच्छिलेली फळे देते, (हे भक्तांनो) तिला नमस्कार करा. अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विद्यालक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

भृगुतनया भवदोष हरी, वर देत, मणी सजले भवती
हसतमुखावर शांति विराजत, कुंडल संग मणी झुलती ।     
नवनिधि दान नि दुःख विनाश, प्रणाम करू सुर देविप्रती
हरिसहचारिणि ज्ञानसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०७॥

टीप- धर्मशास्त्रानुसार या श्लोकात उल्लेखलेले नवनिधी खालील प्रमाणे आहेत.

१. पद्म निधि, २. महापद्म निधि,३. नील निधि, ४. मुकुंद निधि, ५. नंद निधि, ६. मकर निधि, ७. कच्छप निधि, ८. शंख निधि आणि ९. खर्व / मिश्र निधि. यातील क्र. १ ते ८ निधी पद्मिनी विद्येने साध्य होतात.

१. पद्म निधिमुळे मनुष्य सात्विक गुण युक्त होतो. त्याची संपदाही सात्विक असून पिढ्या न पिढ्या टिकते.

२. महापद्म निधि – पद्म निधि प्रमाणे सात्विक असतो आणि त्याचा प्रभाव सात पिढ्यांपलिकडे रहात नाही.

३. नील निधि मध्ये सत्व आणि रज गुणांचे मिश्रण असते व त्याची प्राप्ती व्यापारा द्वारे होते.

४. मुकुंद निधि मध्ये रजोगुण अधिक प्रबळ असतो व त्याला राजस स्वभावाचा निधी म्हटले जाते.

५. नंद निधिमध्ये रज आणि तमो गुणांचे मिश्रण असते.

६. मकर निधीला तामसी निधि असे म्हटले जाते. ही व्यक्ती अस्त्रे आणि शस्त्रे यांचा संग्रह करणारी व पराक्रमी असते.

७. कच्छप निधि असणार्‍या व्यक्ती आपली संपत्ती गव्हाणीतील कुत्र्याप्रमाणे लपवून ठेवतात. त्याचा वापर करीत नाहीत व इतरांनाही करू देत नाहीत.

८. शंख निधि असणार्‍या व्यक्ती धनाचा वापर फक्त स्वतःसाठीच करतात.

९.खर्व निधि असणार्‍या व्यक्ती या वरील सर्व प्रकारांचे मिश्रण असतात व त्यांच्याबद्दल अंदाज बांधणे अवघड जाते.


धनलक्ष्मी
धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि धिंधिमि, दुन्दुभि नाद सुपूर्णमये
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते ।
वेदपुराणेतिहास सुपूजित, वैदिकमार्ग प्रदर्शयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धनलक्ष्मि परिपालय माम् ।। ८ ।।

मराठी- ढोलाच्या धिमिधिमी अशा आवाजात जी पूर्णपणे गुरफटून गेली आहे, शंखाच्या घुम घुम अशा आवाजाने जिची पूजा होते, वेद पुराणे आणि इतिहास यांद्वारे पूजा होणारी ही देवी भक्तांना वैदिक मार्ग दाखवते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धनलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू  माझे पालन कर.

धिमिधिमि धिंधिम ढोल ध्वनी तुज वेढुन टाकत पूर्णपणे
घुमघुम घुंघुम शंख ध्वनी तुज पूजत काय न त्यात उणे ।
श्रुति इतिहास पुराणहि पूजति, ने जन सगळे वेदपथी
हरिसहचारिणि वित्तसुधे, जय हो तव, राख मला जगती  ॥०८॥


फलश्रुती
अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विष्णुवक्ष:स्थलारूढ़े भक्तमोक्षप्रदायिनी॥
शंखचक्रगदाहस्ते विश्वरूपिणि ते जय: ।
जगन्मात्रे च मोहिन्यै मंगलम् शुभ मंगलम्॥

मराठी- इच्छा (पूर्ती) स्वरूपात असणार्‍या, वर देणार्‍या, श्रीविष्णूच्या वक्षस्थळी विराजमान असलेल्या, भक्तांना मुक्ती देणार्‍या, हाती शंख चक्र गदा धारण करणार्‍या, सर्व विश्वाला व्यापून टाकणार्‍या अष्टलक्ष्मी तुला नमस्कार करतो. तुझा विजय होवो. या जगताची आई असलेल्या मोहिनी तू आमचे कल्याण, मंगल कर.

इच्छापूर्तीस्वरूपी तू, होसी सर्वां वरप्रदा
भुजांतरी हरीच्या तू, होसी भक्तांस मोक्षदा ।
शंख चक्र गदा हाती, जगा सर्वत्र व्यापूनी
सकलांचे भले साधी, माता जगतास मोहिनी ॥

॥ इति श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

— धनंजय बोरकर.

९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

4 Comments on श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम् ।।

  1. फारच सुरेख छंदोबध्भाद भाषांतर !
    छान आणि सुरेल भाषांतर झालेले आहे.
    काही वेळा आपल्याला समजणार नाही म्हणून केवळ लाईक करून सोडून दिले जाते.पण आज पूर्ण वाचले.
    समाधान वाटले.

  2. नेहमीप्रमाणे सोपे व सुलभ मराठी रूपांतर. मराठी अर्थ दिल्याने खूपजणांना समजणे अधिकच सोपे होते व झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..