चाञ्चल्यारुणलोचनाञ्चितकृपाचन्द्रार्कचूडामणिंचारुस्मेरमुखां चराचरजगत्संरक्षणीं तत्पदाम्।
चञ्चच्चम्पकनासिकाग्रविलसन्मुक्तामणीरञ्जितां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।१।।
श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या अकराव्या अध्यायात आई जगदंबेच्या विविध अवतारांचे वर्णन आले आहे. त्यात अरुण नावाच्या राक्षसाचा विनाशासाठी जगदंबेने घेतलेल्या भ्रमरांबा अवतारांचे वर्णन आहे.
त्याला मारण्यासाठी आईने आपल्या शरीरातून अनेक भ्रमर अर्थात भुंगे निर्माण केले. त्यामुळे तिला हे नाव पडले.
दक्षिण भारतात श्रीशैल पर्वतावर असणाऱ्या या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
चाञ्चल्यारुणलोचना- भिरभिरणार्या लाल डोळ्यांनी युक्त असणारी. डोळ्यांची हालचाल हे सौंदर्याचे प्रतीक आहे तर त्यांचा लाल रंग प्रेमाचे. चितकृपा- अशा नेत्राने कृपा करणारी.
चन्द्रार्कचूडामणिं- चंद्र आणि सूर्य यांना चुडामणी अर्थात मस्तकावर धारण करणारी. अर्थात तिच्या मस्तकावरील दागिने सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहेत.
चारु- सौंदर्यपूर्ण
स्मेर- किंचित दात दिसणारे सुंदर हास्य.
मुखां- ज्यांनी युक्त मुख असणारी. चराचरजगत्संरक्षणीं- चर अर्थात हालचाल करणारे आणि अचर अर्थात स्थिर अशा सर्व जगाची संरक्षण कर्ती .
तत्पदाम्- तत्वमसि महावाक्यात तत् हे पद ईश्वरासाठी वापरले जाते. तशी ईश्वरी स्वरूप असलेली.
चञ्चल- लोलका प्रमाणे हलत असलेल्या,
चम्पकनासिका- चाफेकळी प्रमाणे असणारी नासिका.
अग्रविलसन्मुक्तामणी- त्यांच्या अग्रभागी शोभून दिसणाऱ्या मोत्याच्या मण्याने,
रञ्जितां- विलसत असलेली.
श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply