लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां लाक्षालसद्रागिणींसेवायातसमस्तदेववनितां सीमन्तभूषांन्विताम्।
भावोल्लासवशीकृतप्रियतमां भण्डासुरच्छेदिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।६।।
लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां- लावण्या मुळे जिची अंगलतिका अधिकच सुशोभित झाली आहे अशी.
सौंदर्य म्हणजे अवयवांचे प्रमाणबद्ध स्वरूप. त्याने व्यक्ती सुंदर दिसते. मात्र ही प्रमाणबद्धता लहान लेकरा पासून वृद्धा पर्यंत असू शकते. तारुण्याच्या काळात त्यात येणारे विशेष आकर्षण म्हणजे लावण्य. आधीच अत्यंत सुंदर असणारी आईची अंगयष्टी या तारुण्यागत लावण्याने अधिकच सुंदर दिसत आहे.
लाक्षालसद्रागिणीं- हाताला आणि पायाला लावण्याचा लाल रंगाचा अळिता म्हणजे लाक्षारस. त्याने अधिकच शोभून दिसणारी.
सेवायातसमस्तदेववनितां- समस्त देवतांच्या वनिता म्हणजे स्त्रिया, जिच्या सेवेकरिता आलेल्या आहेत अशी. सीमन्तभूषांन्विताम्- सीमा म्हणजे भांग. त्यात सौभाग्याचे प्रतीक म्हणून शेंदूर लावल्याने अधिक सुंदर दिसणारी. परम सौभाग्यसंपन्न.
भावोल्लासवशीकृतप्रियतमां- भाव अर्थात आपल्या हावभावाने, उल्हासाने, आपल्या प्रियतम भगवंताला वशीभूत करणारी. भण्डासुरच्छेदिनीं- पुराणामध्ये आलेल्या कथेनुसार भगवान कामदेवांच्या भस्मातून भंडासूर नामक राक्षस निर्माण झाला. भगवान शंकरांच्या
वरदानाने उन्मत्त झालेल्या राक्षसाचा विनाश आई जगदंबे केला. त्यामुळे तिला भण्डासुरच्छेदिनीं असे म्हणतात.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई भ्रमरांबेचे मी भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply