९८) श्री भ्रमराम्बाष्टकम्-७धन्यां सोमविभावनीयचरितां धाराधरश्यामलां
मुन्याराधनमेधिनीं सुमवतां मुक्तिप्रदानव्रताम्।
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां काञ्चीलसन्मध्यमां
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।७।।
धन्यां – धन्य असलेली. धन्यता ही जीवनातील अशी एक सुंदर अवस्था आहे की जेथे काहीही मिळवायचे बाकी नसते. कृतार्थ. सार्थक. आई जगदंबा तशी आहे. सोमविभावनीयचरितां- सोम म्हणजे चंद्र. विभावनीय अर्थात सुंदर. चरित अर्थात चारित्र्य. आचरण.
आई जगदंबेची प्रत्येक लीला चंद्राप्रमाणे शुभ्र, प्रसन्न ,आल्हाददायक आहे.
धाराधरश्यामलां- धारा म्हणजे पर्जन्यवृष्टी. त्यात धारांना धरणारा तो धाराधर म्हणजे मेघ. त्याप्रमाणे सावळ्या वर्णाची असलेली.
भारतीय संस्कृतीत मेघ:शाम हा सौंदर्याचा रंग वर्णिला आहे.
मुन्याराधनमेधिनीं- मुनी म्हणजे ऋषिमुनी. त्यांचे आराधना म्हणजे साधना. तर मेधिनी म्हणजे भूमी.
अर्थात ऋषीमुनींच्या उपासनेचे आधारस्थान.
सुमवतां- सुम म्हणजे पुष्प. विविध फुलांनी अलंकृत असलेली.
मुक्तिप्रदानव्रताम्- साधकांना मुक्ती प्रदान करणे हे जिचे व्रत अर्थात अत्यंत आवडते कार्य आहे अशी.
कन्यापूजनसुप्रसन्नहृदयां- कन्यांचे पूजन केल्यामुळे जिचे मन अत्यंत प्रसन्न होते अशी. काञ्चीलसन्मध्यमां- कांची म्हणजे मेखला, कंबरपट्टा. त्याने मध्यमा म्हणजे कंबर शोभून दिसणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा भ्रमरांबेचे मी भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply