कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥
कर्पूर- कापूर
आगरु- काळे चंदन
कुङ्कुम- कुंकू
अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.
कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.
सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,
कर्मदहनां – कर्माला जाळून टाकणारी.
कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.
कामेश्वरीं – सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.
कामिनीम् – भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.
कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये – श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply