ब्रह्मा विष्णु महेश
तीन रुपें एक अंश
विश्वाचे तुम्हीं ईश
दत्तात्रय रुपांत ।।१।।
उत्पत्ति स्थिति लय
तीन कार्ये होत जाय
विश्वाचा हा खेळ होय
तुझ्या आज्ञेने ।।२।।
तीन देवांचे रुप निराळे
एकत्र होती सगळे
दत्तात्रय होऊन अवतरले
ह्या जगती ।।३।।
दत्त जन्मकथा
आनंद होई वदता
ग्रहण करावे एकचिता
सकळजण हो ।।४।।
तिन्ही लोक फिरुनी
नारद आले विणा घेऊनी
गाऊं लागले स्तुती करुनी
अनुसयेची ।।५।।
अत्रीऋषी पत्नी अनुसया
पतिभक्ती करुनिया
श्रेष्ठ ठरली जगी ह्या
तीन्ही लोकी ।।६।।
ब्रह्मा विष्णु महेश पत्नी
सावित्री लक्ष्मी पार्वती
मिळोनी चर्चा करिती
सती अनुसयेची ।।७।।
तिन्हीं देवी विनविती
आपआपल्या पती
सत्व परिक्षा घेण्याती
सती अनुसयेची ।।८।।
नष्ट करावा पतिधर्म
अतिथी बनोनी करावे कर्म
तिन्ही देवी सांगती हे मर्म
समजावूनी प्रभूंना ।।९।।
अत्रि ऋषींचा आश्रम
अतिथीसाठी विश्राम धाम
यज्ञ याग नि ईश्वर नाम
सतत चालत असे ।।१०।।
अनुसयेची अपूर्व भक्ति
पतिसेवा करुनी होय सती
प्रसन्न तिजवर त्रिमुर्ति
होत असे ।।११।।
अतिथीचे रुप घेतले
अनुसयेच्या द्वारी आले
भिक्षा तिज मागु लागले
विश्वचालक तिन्ही देव ।।१२।।
स्वागत केले अनुसयेने
पुजा केली तयांची तिने
भिक्षा आणली भक्तीने
अर्पिण्या तयांना ।।१३।।
तिन्ही अतिथी उठोनी
भिक्षा तिची नाकारुनी
जावू लागले परतोनी
आश्रम सोडून ।।१४।।
अनुसयें तयांना रोकले
भिक्षा स्विकारण्या विनविले
कांहीं जर असेल चुकले
क्षमा करावी ।।१५।।
देहावर कांहीही नसावे
ह्याला पवित्र समजावे
भिक्षा देत समयी विवस्त्र असावे
समजून घे तू अतिथीना ।।१६।।
विचीत्र अपेक्षा अतिथींची
ही सत्व परिक्षा अनुसयेची
तीच्या पवित्र पतिव्रतेची
ब्रह्मा विष्णू महेश कडून ।।१७।।
अनुसया महान सती
तपसामर्थाने समजून जाती
कोण असावे ते अतिथी
उमजून जाते अनुसया ।।१८।।
अतिथीचे मुल्य महान
अनुसयेने ते जाणून
येऊं द्यावे पति बाहेरुन
विनवितसे थांबण्यांसी ।।१९।।
वेळ नाही आम्हासी
जावयाचे आहे तिर्थासी
उशीर होइल पतीसी
म्हणून उठले अतिथी ।।२०।।
द्विधा झाली मनःस्थिती
एकीकडे धर्म अतिथी
दुसरे ठिकाणीं पतिव्रता सती
काय करावे सुचेना ।।२१।।
पुजेमधले तीर्थ घेतले
पतिदेवाचे स्मरण केले
बाहेर येऊन शिंपडले
अतिथीचे अंगावरी ।।२२।।
परमेश्वरी लिला महान
अतिथी झाले बाळे लहान
मातृत्व बहाल करुन
अनुसयेला ।।२३।।
गोजिरवाणी बाळे तिन्हीं
आलिंगती जवळ घेवूनी
स्थनपान तयांना करुनी
समाधान पावली अनुसया ।।२४।।
सर्व देवता बघती नारदासह
आकाशातून अनुसयेचा भाव
बालरुप तिन्ही देवांचा ठाव
तपोबल शक्तीने ।।२५।।
तिघी झाल्या विचलित
पतीना अणावे कसे परत
अडकले सती शक्ती जाळ्यांत
अनुसयेच्या ।।२६।।
उपाय नाही त्याला
समजूनी घ्यावे सतीला
विनवूनी मागावे पतीला
सुचविले नारदाने ।।२७।।
सावित्री लक्ष्मी पार्वती
निराश होऊन जाती
अनुसयेच्या द्वारी येती
आपल्या पतीसाठी ।।२८।।
तिन्ही देवींना बघूनी
आनंदाश्रु आले नयनीं
पूजा केली वंदन करुनी
अनुसयेने ।।२९।।
आमचे पती परत करावे
बालरुपातून बदलून द्यावे
विश्व चालविण्या मुक्त करावे
जगाच्या कल्याणा ।।३०।।
जावे आपले पती घेऊन
न्यावे तयांना ओळखून
अनुसये बाळे देवून
त्यांचे हाती ।।३१।।
न ओळखी आपले पती
तिघीजणीं निराश होती
बाळरुपें तयांची राहती
सती शक्तींमुळें ।।३२।।
विनवीती देवी तिन्ही
बालरुपें बदलोनी
पतिरुपे परत देऊनी
आम्हास द्यावे ।।३३।।
स्मरण करुनी पतिदेवाचे
शिंपीती तीर्थ पूजेचे
रुप मिळाले अतिथीचे
पतिधर्म शक्तीमुळे ।।३४।।
ब्रह्मा विष्णू महेश
दर्शन देती अनुसयेस
प्रसन्न होऊनी वर माघण्यास
आशिर्वाद दिला ।।३५।।
सार्थक झाले जीवनाचे
दर्शन मिळोनी तिन्ही देवांचे
वंदन करुनी त्या चरणांचे
अनुसया बोले ।।३६।।
थोर भाग्य लाभले मला
स्थनपान केले परमेश्र्वराला
तुम्ही माझे बाळ झाला
खेळला मांडीवरी ।।३७।।
अनुसया बोले सत्वरी
विनंती माझी श्रीहरी
तिघांनी यावे माझे उदरी
एकरुप होऊनी ।।३८।।
तथास्तु म्हटले प्रभूनी
जन्म घेतला दत्त म्हणूनी
त्रिमुर्तीचे रुप घेवूनी
अवतरले ह्या जगती ।।३९।।
देवून मान सती भक्तीला
मार्गशीर्ष शुक्ल पोर्णिमेला
दत्तात्रयाचा जन्म झाला
अनुसयेचे पोटी ।।४०।।
दत्तात्रया श्रेष्ट महती
गुरुचे ठायीं ते असती
गुरुसेवा धर्म नि भक्ती
दत्तात्रया पावत असे ।।४१।।
गुरुकृपे संकटे जाती
सकळजन सुखी होती
गुरुसी पुजिले दत्त पावती
हेचि मर्म जाणावे ।।४२।।
गुरु चरित्र ग्रंथ थोर
त्यात गुरु महिमेचे सार
पारायण करिता सत्वर
पावन होत असे ।।४३।।
दत्तात्रय कथा रोज वाचती
ध्यान तयांचे मनीं करती
दुःख दूर सत्वर होती
गुरु आशिर्वादें ।।४४ ।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
४- ०७११८३
Leave a Reply