ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला ‘परिपूर्ण’ म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व ‘गुरु’ म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.
पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||
यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. ‘मला सगळं काही कळतं.’ ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
Leave a Reply