दारिद्रयविद्रावणमाशु कामदं !स्तोत्रं पठेदेतदजस्रमादरात् !!
पुत्री कलत्रस्वजनेषु मैत्री
पुमान् भवेदेकवरप्रसादात् !! ६!!
भारतीय संस्कृतीत प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते.
“निर्गुण निराकार परब्रह्माची निष्काम उपासना!” हे जरी मानवी जीवनाचे परम ध्येय असले तरी सर्वसामान्य जीवांसाठी ते सहजसुलभ नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सामान्य जीव हा सकामच असणार. आपल्या त्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी तो सगुण साकार स्वरूपाचीच आराधना करणार. हे वास्तव जगद्गुरु स्वीकारतात आणि म्हणूनच अद्वैताच्या परमोच्च अवस्थेत न बसणाऱ्या सगुण उपासनेला साह्यभूत होणारी स्तोत्रे ते सामान्य माणसाला रचून देतात.
व्यवहारव्यस्त गृहस्थ व्यक्तिमत्वांसाठीच ही स्तोत्रे असल्याने त्यांच्या या समस्यांच्या पूर्तीचा मार्ग यात आहे हे सांगण्यासाठीच ते म्हणतात,
दारिद्रयविद्रावण- हे स्तोत्र दारिद्र्याला विरघळवून टाकणारे आहे.
आशु कामद- अल्पावधीत अपेक्षित असणारे सर्वकाही प्रदान करणारे आहे.
पुत्र अर्थात संतती, कलत्र अर्थात सहधर्मचारिणी ही आनंदाची साधने देखील प्राप्त होतील.
स्वजनेषु मैत्री- ही मोठी सुंदर गोष्ट आचार्य मांडत आहेत. आपल्या नातेवाइकांमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये आपल्याला मित्राप्रमाणे प्रिय स्थान लाभेल. ही भेट खरोखरच मोठी मार्मिक आहे.
सामान्य जीवनातील आनंदाच्या साधनांमध्ये मैत्री हे सगळ्यात सुंदर माध्यम आहे.
नातेवाईक आपण ठरवून मिळवत नाही. ते आहेत तसे स्वीकारणे भाग असते. पण मैत्रीचे तसे नाही. ती विचारपूर्वक केली जाते. त्यामुळेच मित्रांसह माणूस अधिक आनंदी असतो. आचार्य श्री म्हणतात की गणेश कृपेने तोच आनंद नातेवाईकांसह मिळेल. त्यामुळेच ही शुभेच्छा आगळीवेगळी ठरते.
हे सर्व ज्या गणेशांच्या कृपेने मिळणार त्यांच्यासाठी आचार्य शेवटच्या ओळीत शब्द वापरतात “एकवर.” अर्थात हे सर्व वर देण्यास एकटे श्रीगणेशच समर्थ आहेत.
त्या श्रीगणेशांना सादर वंदन असो.
जय गजानन.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply