विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!
गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
विरूपलोचनस्तुत होत.
गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया – भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, “गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया “. निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.
Leave a Reply