नवीन लेखन...

श्रीगणेशभुजङ्गम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना भुजंगप्रयात या वृत्तात केलेली असल्याने त्याला गणेश भुजंगम् असे म्हणतात.

पहिल्याच श्लोकात गणराज रंगी नाचतो या कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीताची आठवण करून देणारे व विशेषतः गणेशाच्या रूपाचे व कलाविष्काराचे वर्णन करणारे हे रसाळ स्तोत्र समजण्यासही सोपे आहे. गणेश हा गजवदन असल्यामुळे आचार्यांनी त्या संदर्भात योजलेले ‘ पद्म (श्लोक १) व बिंदू (श्लोक ५) ’ हे हत्तीच्या अंगावरील रंगपूर्ण नक्षीचे वर्णन करणारे द्व्यर्थी शब्द चित्तवेधक वाटतात.

रणत्क्षुद्रघण्टानिनादाभिरामं
चलत्ताण्डवोद्दण्डवत्पद्मतालम् ।
लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं
गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ १॥

मराठी- ज्याच्या (पायीच्या) घुंगरांचा किणकिणाट मनोहर वाटतो, बेभान नृत्याच्या हालचाली करत असता ज्याचे हत्तीसारखे कान थरथरतात, ज्याच्या लठ्ठ अंगावर सर्पाचा हार शोभून दिसत आहे, त्या शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

झणत्कार सुश्राव्य जै घुंगुरांचे
गती सोंड कानांस, बेभान  नाचे |
जया सर्प दोंदावरी हार झाला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०१ ॥ 


ध्वनिध्वंसवीणालयोल्लासिवक्त्रं
स्फुरच्छुण्डदण्डोल्लसद्बीजपूरम् ।
गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमालंगणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ २॥

मराठी- प्रसन्न मुखातून येणा-या स्वरांनी ज्याने वीणेच्या लयबद्ध सुरांचा तोरा उतरवला आहे, ज्याच्या  तेजस्वी सरळ सोंडेत बियाळ फळ शोभून दिसत आहे, ज्याच्या मस्तकावरून पाझरणार्‍या मदाच्या सुगंधामुळे भुंग्यांचे थवे झेपावत आहेत त्या शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

विणा नाद हारे जयाच्या स्वरांनी
झळाळे तशी सोंड नाना फळांनी ।
सुगंधे मदाच्या थवा भृंग आला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०२॥

टीप- दुसर्‍या चरणातील ‘ बीजपूर ’ या शब्दाचा अर्थ ‘ बियांनी परिपूर्ण फळ ’ असा असल्यामुळे विविध अभ्यासकांनी विविध फळांचा (महाळुंग / इडलिंबू / पेरु / डाळिंब)  उल्लेख केलेला दिसतो.


प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून-
प्रवालप्रभातारुणज्योतिरेकम् ।
प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं
गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ ३॥

मराठी– ज्याचे तेज जास्वंदाच्या फुलाच्या लालीप्रमाणे, रत्ने, प्रवाळ व उगवत्या सूर्याच्या तेजाप्रमाणे लालभडक आहे, ज्याचे उदर विशाल आहे, ज्याला एकच दात आहे व मुख वाकडे आहे त्या  शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

प्रभा लाल जास्वंद पुष्पे जयाला
हिरे, पोवळे लाल, पूर्वेस गोळा ।
थिटा दात, पोटाळ, वक्रा मुखाला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०३॥


विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीटं
किरीटोल्लसच्चन्द्ररेखाविभूषम् ।
विभूषैकभूषं भवध्वंसहेतुं
गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ ४॥

मराठी– ज्याच्या मुकुटावर विविध रंगीबेरंगी रत्नांच्या माळा झळकत आहेत, आणि मुकुट चंद्राच्या किरणांनी सुशोभित झाला आहे, जो अलंकारांना शोभायमान करतो (अलंकारांचाही अलंकार आहे) जो भवाच्या (जगातील दुःखांचा) नाशाचे कारण आहे, त्या शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

मुकूटावरी रंगिबेरंगि माला
शशी रश्मिने तो सुशोभीत केला ।
ढळे दागिना तेज,  नाशी भवाला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०४॥


उदञ्चद्भुजावल्लरीदृश्यमूलो-
च्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्षम् ।
मरुत्सुन्दरीचामरैः सेव्यमानं
गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ ५॥

मराठी– आपल्या उभारलेल्या बाहूलता मागेपुढे हलवून, आपल्या भुवया रूपी वेलींच्या सौंदर्याने युक्त स्वर्गीय सुंदरी ज्याच्यावर चवरी ढाळतात, त्या शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

दिसे देखणे दृश्य बाहूलतांचे
उभारून मागे पुढे हालण्याचे ।
शिरी ढाळिती चामरां दिव्य बाला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०५॥   


स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं
कृपाकोमलोदारलीलावतारम् ।
कलाबिन्दुगं गीयते योगिवर्यै-
र्गणाधीशमीशानसूनुं तमीडे ॥ ६॥

मराठी– ज्याच्या रागीट तेजस्वी डोळ्यातील पिंगट बाहुल्या (दुष्टजनांकडे) रोखलेल्या आहेत (पण त्याच वेळी) जो (भक्तजनांप्रति) दयापूर्ण कोमल आणि उदार लीला दाखवतो, श्रेष्ठ योगीजन ज्याच्या चंद्रकोर व अनुस्वारासह ‘गं ’ मंत्राचे गायन करतात, त्या शंकराचा पुत्र गणेशाची मी स्तुती करतो.

कणी लाल तेजस्वि क्रोधे थरारे
मृदू खेळ दावी कृपानेत्र सारे । (कणी- डोळ्याची बाहुली)
मुनी गात ‘गं’ कोर टिंबा जपाला
नमस्कार माझा हराच्या सुताला ॥ ०६॥   

टीप-  बिंदु या शब्दाचा एक अर्थ ‘ हत्तीच्या अंगावर रंगवलेली चित्रे ’ असाही आहे. तो घेतल्यास ‘कलाबिन्दु’ चा अर्थ गणेशाच्या सोंडेवर रंगवलेली नक्षी असाही होऊ शकेल.


यमेकाक्षरं निर्मलं निर्विकल्पं
गुणातीतमानन्दमाकारशून्यम् ।
परं परमोङ्कारमान्मायगर्भं ।
वदन्ति प्रगल्भं पुराणं तमीडे ॥ ७॥

मराठी– जो ओंकारस्वरूप आहे, (मायाविरहित) विशुद्ध आहे, अद्वितीय आहे, निर्गुण निराकार आणि आनंदमय आहे, सर्वश्रेष्ठ आहे, या जगताच्या आरंभाच्या पलिकडे (अनादी) आहे, ज्याने सर्व वेदांना सामावून घेतले आहे, जो ख्यातकीर्त आहे, आणि सनातन आहे असे सर्वजण म्हणतात त्या (गजानना)ला मी वंदन करतो.

निराकार ओंकार शुद्ध स्वरूपी
अनादी गुणातीत वेदांस व्यापी ।
चिदानंद जो श्रेष्ठ सर्वांस ठावा
परीपक्व हेरंब मी तो नमावा ॥०७॥

टीप- प्रथम चरणातील ‘एकाक्षर – ओंकार’ यावरून ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘अकार चरण युगुल।

उकार उदर विशाल।’ या गणेश स्तवनाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.


चिदानन्दसान्द्राय शान्ताय तुभ्यं
नमो विश्वकर्त्रे च हर्त्रे च तुभ्यम् ।
नमोऽनन्तलीलाय कैवल्यभासे
नमो विश्वबीज प्रसीदेशसूनो ॥ ८॥

मराठी–  जो चैतन्य आणि आनंद यांनी ओतप्रोत, शांतस्वरूप आहे अशा तुला नमस्कार असो. जो या विश्वाचा निर्माणकर्ता व विनाशकर्ता आहे अशा तुला नमस्कार असो. (या विश्वाच्या कल्याणासाठी) जो अनंत लीला करतो, जो मोक्षाची जाणीव करून देतो, सार्‍या विश्वाचे मूळ आहे, अशा शिवपुत्रा, तुला नमस्कार असो.

बहू शांत चैतन्य आनंद भासे
करी निर्मिती, पोशितो विश्व तैसे ।
बहू खेळ दावी, जनां मोक्ष दाता
जगा मूळ बीजा नमस्कार आता ॥ ०८॥


इमं सुस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या
पठेद्यस्तु मर्त्यो लभेत्सर्वकामान् ।
गणेशप्रसादेन सिध्यन्ति वाचो
गणेशे विभौ दुर्लभं किं प्रसन्ने ॥ ९॥

मराठी– हे सुंदर स्तोत्र जो सकाळी उठून भक्तीने म्हणेल त्या मनुष्याला इच्छिलेले सर्व लाभेल. गणेशाच्या कृपेने त्याच्या बोलण्याला सिद्धी प्राप्त होईल. सार्वभौम गणेश प्रसन्न झाल्यावर दुष्प्राप्य ते काय ?

म्हणे भक्तिने जो सकाळी उठोनी
भले स्तोत्र हे जात सारे मिळोनी ।
मनी इच्छिले ते, मिळे सिद्ध वाचा
उणे ना कृपालाभ हो आखुगाचा ॥ ०९॥    (आखुग – गणेश, आखु – उंदीर)

******************

धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..