नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं
नताधिकापदुद्धरम् !!
सुरेश्वरं निधीश्वरं
गजेश्वरं गणेश्वरं !
महेश्वरं तमाश्रये
परात्परं निरंतरम् !!२!!
नतेतरातिभीकर – नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर.
नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, ज्ञानाचा, तेजाचा वर्षाव करणारे. तरीही सूर्याप्रमाणे दाहक नसलेले, प्रसन्न मनमोहक असणारे.
नमत्सुरारिनिर्जरं – सुरारी अर्थात सुरांचे म्हणजे देवांचे शत्रू, दैत्य. तर निर्जर म्हणजे देव. त्यांना कधीच जरा म्हणजे म्हातारपण येत नसल्याने त्यांना निर्जर असे म्हणतात. हे दोन्ही ज्यांना वंदन करतात ते नमत्सुरारिनिर्जर.
नताधिकापदुद्धर- विनम्र असलेल्या आपल्या भक्तांच्या मोठातल्या मोठ्या आपत्तींमधून अर्थात शास्त्रीय भाषेत या संसारदु:खातून उद्धार करणारे ते नताधिकापदुद्धर.
सुरेश्वर अर्थात सगळ्या देवांचे देव.
निधीश्वर अर्थात सर्वप्रकारच्या वैभवांचे स्वामी.
गजेश्वर अर्थात निर्गुण निराकार परब्रह्म. जे सगुण-साकार ते जग. त्याच्या विपरीत ते गज.ते निर्गुण निराकारत्व हेच मोरयाचे वैभव. त्यामुळे ते गजेश्वर
गणेश्वर अर्थात गणांचे ईश्वर. शास्त्रात व्यष्टी आणि समष्टी असे दोन स्तरांवर वर्णन असते.
व्यष्टी स्तरावर व्यक्तिगत स्वरुपात, शरीरातील विविध अवयवांच्या शक्तींना गण म्हणतात. तर समष्टी अर्थात वैश्विक पातळीवर सर्व देवी-देवतांना ईश्वर महेश्वरांना गण असे म्हणतात. या सगळ्यांवर भगवान गणेशांचा अधिकार चालत असल्याने त्यांना गणेश्वर असे म्हणतात.
महेश्वर अर्थात सगळ्यात मोठे ईश्वर. सर्वपूज्य, सर्वादिपूज्य परब्रह्म.
त्या परात्पर अर्थात श्रेष्ठाहून श्रेष्ठ भगवंताला मी निरंतर अर्थात सदैव शरण जातो. माझ्या सकल कल्याणार्थ त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो.
— — प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply