नवीन लेखन...

श्रीगोविन्दाष्टकम् – मराठी स्वैर गद्य व पद्य अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांनी हे श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा उल्लेख करणारे रसाळ स्तोत्र आर्या वृत्तात रचले आहे. अनुप्रास अलंकाराने ते विशेष नटले आहे. त्यामुळे ते अतीव गेयही आहे. ते वाचताना काही ठिकाणी ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या संत नामदेवांच्या निर्गुणाचे सगुण रूप खुलवून सांगणा-या अभंगाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. फक्त त्यांचा बाळकृष्ण राजमंदिरात रांगतो, तर आचार्यांचा गोठ्यासमोरच्या पटांगणात !

सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं
गोष्ठप्राङ्गणरिङ्खणलोलमनायासं परमायासम् ।
मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं
क्ष्माया नाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ १॥

मराठी- जो ज्ञान स्वरूप, अनंत, चिरंतन, सत्य, अमर्याद (अवकाशात न मावणारा) परब्रह्म आहे, जो गोठ्यासमोरच्या पटांगणात इकडून तिकडे रांगतो, ज्याच्यावर मोठ मोठी संकटे आली तरी त्यातून सहज सुटतो, जो निराकार असूनही मायेमुळे विविध आकार घेतो, (किंबहुना) सर्व विश्वाचा आकार धारण करतो, ज्याचा कोणीही स्वामी नाही अशा लक्ष्मीपतीला, अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

अमर्याद परब्रह्म, सत्य चिरंतन अनंत जो ज्ञानी
गोठ्यासमोर रांगे, सहज सुटे वेढता संकटांनी ।
व्यापुन विश्वा, रूपे मायेतुन वेगळी, निराकारा
वंदा परमानंदा, स्वामी नाही जया, रमेच्या वरा || १


मृत्स्नामत्सीहेति यशोदाताडनशैशव सन्त्रासं
व्यदितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिम् ।
लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं
लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ २॥

मराठी- “तू इथे माती खातोयस “असे यशोदा ओरडल्यावर लहान बालकाप्रमाणे घाबरून थरथर कापणाऱ्या, आणि उघडलेल्या तोंडातून दृश्य आणि अदृश्य अशा चौदा लोकांची मालिका दिसणाऱ्या, जो तिन्ही लोकांचा (स्वर्ग,पृथ्वी,पाताळ) (आधार) खांब आहे, जो दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात असतो, जो या विश्वाचा स्वामी आहे, अशा अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

“येथे माती खासी ” क्रुद्ध यशोदा, बालक घाबरता
ओळ दिसे लोकांची चवदा, दृश्यादृश्य, मुखा उघडिता ।
त्रिलोक मूलाधारा, विश्वा स्वामी, कुणा दिसे न दिसे
प्रणाम गोविंदाला, महान मोदस्वरूप जो विलसे ॥ ०२

टीप- येथे यशोदेच्या गोष्टीचा संदर्भ श्रीमद भागवताच्या दशम स्कंधातील आठव्या अध्यायाशी आहे. उल्लेखलेले चौदा लोक – सप्तवर्ग आणि सप्तपाताळ मिळून- भूः, भुवर्, स्वर्, महर्, जन, तप, सत्य हे सात लोक आणि अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल व पाताल हे सात पाताल लोक मिळून चौदा लोक.


त्रैविष्टपरिपुवीरघ्नं क्षितिभारघ्नं भवरोगघ्नं
कैवल्यं नवनीताहारमनाहारं भुवनाहारम् ।
वैमल्यस्फुटचेतोवृत्तिविशेषाभासमनाभासं
शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ३॥

मराठी- देवांचे बलाढ्य शत्रू (राक्षस) ठार मारणा-या, धरतीचा भार कमी करणा-या, (भक्तांचा) भवरूपी रोग नष्ट करणा-या, सर्वांपासून अलिप्त, निराहार असून लोणी चाखणा-या आणि सर्व विश्व गिळंकृत करणा-या, मनाच्या स्वच्छ आणि शुद्ध अवस्थेत विशेष तेजाने प्रकटणा-या, परंतु स्पष्ट प्रतिमा न दिसणा-या, सर्वांना हितकारी, केवळ शांतिरूप आणि परमोच्च आनंदावस्थेतील गोविंदाला नमन करा.

भव ताप हरी, मारी बलाढ्य दानव, हलकी भूमि करी,
अलिप्त  विश्वा गिळुनी, लोणी चाखी, खरा निराहारी |
मनात तेजे झळके, शुद्ध स्वच्छ, नच उमटे चित्र जरी
निरव स्तब्ध हितकारी, श्रेष्ठ हर्ष, हा प्रणाम घे श्रीहरी || ३

टीप- येथील विश्वाला गिळण्याचा संदर्भ अर्जुनाच्या विश्वरूप दर्शनाशी आहे.


गोपालं प्रभुलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं
गोपीखेलनगोवर्धनधृतिलीलालालितगोपालम् ।
गोभिर्निगदित गोविन्दस्फुतनामानं बहुनामानं
गोपीगोचरपथिकं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ४॥

मराठी- जो या पृथ्वीचा पालक आहे, जो ईश्वरी लीलेच्या माध्यमातून गायी पाळणारा झाला, जो यादव वंशाचा पालक आहे, जो गोपिकांबरोबर विविध खेळ खेळतो, ज्याने गोवधन पर्वत सहज उचलून गोपजनांना आनंदित केले, (गोकुळातील) गायी हंबरताना ज्याचे नाव स्पष्टपणे गोविंद असे उच्चारतात, ज्याला अनेकविध नावे आहेत, जो गोपिकांच्या (आध्यात्मिक) वाटेवरचा मार्गदर्शक आहे , अशा अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

दैवी लीला, पाळी जगजेठी गोधना यादवांना
गोवर्धन उचलोनी, गोपी गोपांसवे खेळ नाना ।
नाना नावे, गायी स्वच्छ हाक हरि-माधव हंबरती
वाटाड्या गोपींचा, परम हर्ष हा प्रणाम घे श्रीपती  || ४

टीप- येथे ‘गोपीगोचरपथिकं’ चा अर्थ वेगवेगळ्या रीतींनी लावता येईल. गोपी (सृष्टी,गवळण); गोचर(पोहोच,गायरान,निवास,नजरेचा टप्पा;) पथिक (वाटसरू,फेरफटका मारणारा,मार्गदर्शक) या विविध अर्थांनुसार,  (गोपिकांच्या घरचा पाहुणा), (गोपिकांच्या गायींच्या चराऊ कुरणातला फिरस्ता), (ज्याच्या वाटेकडे गोपिका डोळे लाऊन असतात), (जो निसर्गातील वाटांवरचा वाटसरू आहे), अशा अनेक छटा शक्य आहेत.


गोपीमण्डलगोष्ठिभेदं भेदावस्थमभेदाभं
शश्वद्गोखुरनिर्घूतोद्धतधूलीधूसरसौभाग्यम् ।
श्रद्धाभक्तिगृहीतानन्दमचिन्त्यं चिन्तितसद्भावं
चिन्तामणिमहिमानं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ५॥

मराठी- गोपींच्या मैत्रिणींच्या प्रत्येक गटात जो विविध रूपात उपस्थित होता, (परंतु तो एकच होता)  त्यात फरक नव्हता, गुरांच्या खुरांमुळे उधळलेल्या सततच्या धुळीमुळे ज्याचे सौदर्य झाकोळून जाते,

जेथे श्रद्धा व भक्ती आहे तेथे कल्पना करू शकणार नाही असा आनंद असणारा, सज्जन ज्याचे चिंतन करत असतात, इच्छित गोष्टी देणर्‍या मण्यासारखी ज्याची महती आहे, अशा अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

गोपी गटात सगळ्या, दिसे वेग वेगळा, परी एकला
लावण्या झाकोळी, धेनु धुळीचा लोट जधी उठला |
कळतो सुजाण भक्ता, श्रद्धा भक्ती मोद अकल्पित दे
श्रेष्ठ हर्ष गोविंदा, चिंतामणि महतीला हा वंदे || ५


स्नानव्याकुलयोशिद्वस्त्रमुपादायागमुपारूढं
व्यदित्सन्तिरथ दिग्वस्त्रा ह्युपुदातुमुपाकर्षन्तम् ताः ।
निर्धूतद्वयशोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं
सत्तामात्रशरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ६॥

मराठी- स्नानामध्ये पूर्णपणे मग्न असलेल्या तरुण स्त्रियांचे कपडे बरोबर घेऊन झाडावर चढून बसलेला आणि त्यांची वस्त्रे परत देण्यासाठी त्यांना दिगंबर अवस्थेत जवळ येण्यास भाग पाडणारा, संभ्रम तसेच दुःख या दोन्हीचा त्याग केलेला, ज्ञानाच्या अंतरी वास करणारा ज्ञानी, भलाईने जणू शरीर धारण केले आहे, अशा परमोच्च आनंदावस्थेतील गोविंदाला नमन करा.

स्नान मग्न तरुणींचे कपडे पळवुन, बसला तरुवरी
देण्या परत तयांना, जवळ दिगंबर येणे बाध्य करी |
उभय खेद भ्रम टाकी, मतीमान जो मतीत वास करी
सद्भाव देहधारी, अत्त्यानंदा प्रणाम तुज श्रीहरी || ६


कान्तं कारणकारणमादिमनादिं कालमनाभासं
कालिन्दीगतकालियशिरसि मुहुर्नृत्यन्तं नृत्यन्तम् ।
कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषघ्नं
कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ७॥

मराठी-  दिसण्यात अत्यंत सुंदर, (विश्वाच्या) मूलतत्त्वाचा स्रोत असलेल्या, ज्याला प्रारंभ नाही, जो सर्व विश्वाची सुरुवात आहे (सर्व विश्वाची सुरुवात ज्याच्या पसून झाली आहे), जो आकाशीच्या मेघाप्रमाणे काळा आहे, यमुना नदीत असलेल्या कालिया नागाच्या फण्यावर पुनःपुनः (दीर्घकाळपर्यंत) नाच करणार्‍या, जो साक्षात युग(पुरुष) असून काळाच्या खेळापलिकडे आहे (ज्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही), जो सर्वज्ञ आहे, जो सद्य युगाच्या दुष्ट गोष्टींचा नाश करतो, (भूत,वर्तमान,भविष्य अशा) त्रिकालाच्या प्रवाहाला जो कारणीभूत आहे, अशा अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

विश्वारंभ, सुरेख, सूक्ष्म कणांचा स्रोत, अभ्र काळा
नाच नाचतो कालियमाथा डोही घुसळी यमुना जळा ।
नाशी दोष कळीचे, सर्व जाणता, दाद न दे काळा
परमानंद हरीला वंदन देई गति जो तिन्हि काळा ॥ ७


वृन्दावनभुवि वृन्दारकगणवृन्दाराध्यं वन्देऽहं
कुन्दाभामलमन्दस्मेरसुधानन्दं सुहृदानन्दम् ।
वन्द्याशेषमहामुनिमानसवन्द्यानन्दपदद्वन्द्वं
वन्द्याशेषगुणाब्धिं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥ ८॥

मराठी- वृंदावनामध्ये, देवांच्या समूहाने आराधना करण्यास योग्य, ज्याचे कुंदफुलांसारखे शुभ्र स्मितहास्य सुजनांना अमृताचा आनंद देते अशा (मुरारीला) मी नमस्कार करतो. सर्व महान ऋषि मुनींच्या मनी ज्याच्या आनंददायी पावलांची जोडी वंदनीय आहे, सर्व वंदनीय गुणांचा जो महासागर आहे, अशा अत्युच्च आनंद स्वरूप गोविंदाला नमन करा.

गोकुळात देवांच्या दलास जो पूजनीय त्या नमितो
हास्यें कुंद्सुमासम शुभ्र सज्जनां अमृत चव देतो ।
महर्षि योगीयांच्या मना पाउले वंदनीय असती
गुणसागर परिपूर्ण परम हर्ष हा प्रणाम घे श्रीपती ॥ ८


गोविन्दाष्टकमेतदधीते गोविन्दार्पितचेता यो
गोविन्दाच्युत माधव विष्णो गोकुलनायक कृष्णेति ।
गोविन्दाङ्घ्रिसरोजध्यानसुधाजलधौतसमस्ताघो
गोविन्दं परमानन्दामृतमन्तःस्थं स तमभ्येति ॥ ९

मराठी- जो हे गोविंदाला अर्पण केलेले गोविंदाष्टक मनापासून परिशीलन करतो, हे गोविंदा, अच्युता, माधवा, विष्णो, कृष्णा असे ध्यान करतो, त्याची पापे श्रीकृष्णाच्या पदकमलाच्या ध्यानरूपी अमृतजलाने धुतली जातात व तो अंतरीच्या अत्त्युच्च आनंदरूपी अच्युताप्रत पोहोचतो.

पाठ आठ श्लोकांचा हरिठायी ठेवून ठाम भावा
अच्युत गोकुळनायक कृष्ण विष्णु गोविंद माधवा वा |
ध्यान पादपद्माचे अमृतजल धूतसे पातकाला
मोदस्वरूपी माधव, मनी मावला, सवे मेळ झाला ॥ ९

॥ इति श्रीमद् शंकराचार्यकृतम् गोविन्दाष्टकम् संपूर्णम् ॥

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्रीगोविन्दाष्टकम् – मराठी स्वैर गद्य व पद्य अर्थासह

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..