मारुतिराया या देहातच दर्शन देई रे
श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।।
प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई
पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई
नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।।
उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती
रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती
नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।।
धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात
श्रीरामाचा जप चालू दे तेंव्हा हृदयात
तेज रवीचे झळको वदनी अंजनिकुमारा रे ।।३।।
रुंद रुंदशी छाती द्यावी प्रहार झेलाया
स्वकर्मकुसुमे गुंफू माळा तुजला पूजाया
आत्मबुद्धिचा वज्रासम तू निश्चय देई रे ।।४।।
द्रोणागिरि पेलला करावर सांभाळुन आणला
लंकेला जाळले, रावणा विक्रम दाखविला
सीतेला शोधले प्रयत्ने विमल बुद्धी दे रे ।।५।।
‘जय बजरंगा जय हनुमंता’ जयजयकार करू
तुझिया आशीर्वादे आम्ही अजिंक्य वीर ठरू
बालक रामा दास्यभक्ति तू आपण शिकवी रे ।।६।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
Leave a Reply