अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।अङ्गीकृताऽखिल-विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गलदेवतायाः ॥१॥
भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य स्वामी महाराज भिक्षा मागण्यासाठी गेले असता एका मातेची अत्यंतिक गरिबी पाहून द्रवलेल्या त्यांच्या मनात हे स्तोत्र स्फुरले आहे अशी कथा आहे.
आरंभी आचार्यश्री आई जगदंबा महालक्ष्मीच्या कृपादृष्टी चे वर्णन करीत आहेत. कशी आहे ही कृपादृष्टी?
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्- जशी एखादी भृंगांगणा म्हणजे भ्रमरी, मुकुल अर्धवट उमललेल्या कळ्यांनी डवरलेल्या तमाल वृक्षावर वारंवार घुटमळत राहते. तशी,
अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव- आई जगदंबेची दृष्टी, अंगावर रोमांच फुललेल्या भगवान श्रीहरी यांच्या अंगावर सतत जात असते.
भ्रमरी जशी सतत झाडावर बसून राहत नाही तशी ती दृष्टी टक लावून पहात नाही. पण जशी ती झाडाला सोडून दुसरीकडे जातही नाही तशी आईची दृष्टी अन्यत्र वळत ही नाही. नेत्र कटाक्षातील चंचलतेचे सौंदर्य आणि श्रीहरी पाशी असणारी स्थिरता दोन्ही गोष्टी आचार्यांनी एकत्र दाखविल्या आहेत.
अङ्गीकृताऽखिल-विभूतिरपाङ्गलीला- अशी ती अपांगलीला म्हणजे डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच तिरपे पाहणे, संपूर्ण विश्वातील विभूतीला अर्थात संपूर्ण सौंदर्यपूर्ण गोष्टींच्या संग्रहाला धारण करते. अर्थात जगातील सर्व सौंदर्य हे एका बाजूला आणि आईच्या दृष्टीचे सौंदर्य एका बाजूला.
माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गलदेवतायाः- अशी माझ्या मंगल देवतेची दृष्टी मला मांगल्य प्रदान करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply