नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।
आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.
नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.
नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply