दग्धिस्तिभि: कनकुंभमुखावसृष्टिस्वर्वाहिनी विमलचारूजलप्लुताङ्गीम।
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथगृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।१६।।
दग्धिस्तिभि:- पुराणांतील अनेक संकल्पना पैकी संकल्पना आहे दिग्गज. पृथ्वीच्या आठ दिशेस हे आठ हत्ती असतात. त्यांच्या आधारावर पृथ्वी स्थिर असते.
ही संकल्पना प्रतिकात्मक आहे. सगुण-साकार गोष्टीला जग म्हणतात. याच्या विपरीत निर्गुण-निराकाराला गज असे म्हणतात.
अर्थात बाहेरून निराकार तत्त्वाच्या आधारे, सामान्य शब्दात निराधार स्वरूपात पृथ्वी असते.
प्रतीकरूपात स्वीकारलेले गज म्हणजे हत्ती हे समृद्धीचे सर्वोच्च टोक.
असे हत्ती दारात झुलत असणे श्रीमंतीचे सगळ्यात मोठे प्रतीक आहे. याला गजान्तलक्ष्मी म्हणतात.
असे हत्ती आपल्या शुंडांनी आई जगदंबेच्या मस्तकावर अभिषेक करतात.
हत्ती सामान्य असते तर त्यांचे घडे सामान्य असते आणि पाणी सुद्धा. येथे मात्र सर्वच अद्वितीय आहे. आचार्यश्री म्हणतात,
कनकुंभमुखावसृष्टि- त्यांनी आपल्या सोंडे मध्ये घेतलेले घडे सोन्याचे आहेत. त्या घड्यांचा मुखातून ती वर्षाव करत आहेत. कशाचा?
स्वर्वाहिनी- स्वर् वाहिनी अर्थात स्वर्गातून वाहणारी. देवी मंदाकिनी गंगा.
विमलचारूजल- तिचे विमल अर्थात अत्यंत शुद्ध तर चारु म्हणजे अत्यंत सुंदर, अशा जलाच्या द्वारे,
प्लुताङ्गीम- जिचे अंग ओलेचिंब झाले आहे अशी.
प्रातर्नमामि – त्या आई जगदंबे ला मी सकाळी वंदन करतो. येथे सकाळी म्हणताना दिवसाचे पहिले काम, हा अर्थ अपेक्षित आहे.
अर्थात आई जगदंबेची उपासना हेच आयुष्यातील प्राथमिक कार्य आहे.
जगतां जननीमशेष- अशेष म्हणजे संपूर्ण, जगाची जननी अर्थात माता. कशी आहे ही माझी माता?
लोकाधिनाथगृहिणी- हे लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. त्यांचे नाथ म्हणजे स्वामी अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची गृहिणी अर्थात प्रिय पत्नी. अमृताब्धिपुत्रीम्- अमृत अब्धि अर्थात दुधाचा समुद्र, क्षीरसागर. त्याच्यातून निर्माण झाली या अर्थाने त्याची पुत्री.
तिला वंदन असो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply