स्तुवन्ति ये स्तुतिभिरमिभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।१८।।
स्तुतिभिरमिभि: – या स्तुतीच्याद्वारे, या स्तोत्राचा आधारे.
अन्वहं- अनु म्हणजे प्रत्येक आणि अह म्हणजे दिवस. अर्थात प्रत्येक दिवशी. नित्यनियमाने.
स्तुवन्ति ये- जे स्तुती करतात.
स्तवन नित्यनियमाने हवे. अडचण आल्यावर नाही.
त्रयीमयीं- त्रयी शब्दाचा एक अर्थ आहे तीन वेद. त्या ज्ञानाने युक्त असणारी. त्रयी शब्दाचा दुसरा अर्थ आहे, सत्व,रज आणि तम यांची साम्यावस्था. त्रयी शब्दाचा तिसरा अर्थ आहे, स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ यांचा समूह.
या सगळ्यांमध्ये परिपूर्ण व्यापलेली ती त्रयीमयी.
त्रिभुवनमातरं- तीनही भुवनांची, तेथील समस्त जीवांची माता.
रमाम्- संपूर्ण विश्वाला रममान करणारी.
अशा आई महालक्ष्मीची जे भक्त या स्तोत्राच्या द्वारे स्तुती करतात.
भवन्ति ते- ते होतात.
गुणाधिका- अधिक गुणसंपन्न. अर्थात विश्वातील समस्त जीवांपेक्षा अधिक गुणशाली. गुरुतरभाग्यभागिनो – गुरु तर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. अशा भाग्याचे, भाजन अर्थात पात्र.
अर्थात त्यांना सर्वाधिक श्रेष्ठ असे भाग्य प्राप्त होते.
बुधभाविताया:- बुध अर्थात ज्ञानी लोक. भावित अर्थातच कौतुक केलेले.
अर्थात आई जगदंबा, महालक्ष्मीच्या कृपेने या स्तोत्राचे पठण कर्ते विद्वान लोकांच्या कौतुकाला पात्र ठरतात.
भिक्षा मागायला गेल्यानंतर एका दरिद्री वृद्ध स्त्रीच्या परिस्थितीने गलबलून गेलेल्या पूज्यपाद आचार्यश्रींनी आई महालक्ष्मीची प्रार्थना केल्यानंतर ते ज्या गरीब वृद्ध महिलेच्या अंगणात उभे होते. तेथे असणाऱ्या आवळ्याच्या झाडांवरून सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. त्या स्त्रीचे दारिद्र्य कायमचे दूर झाले.
अशी कथा या स्तोत्राच्या सोबत वर्णन केली जाते.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply