प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन।
मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।।
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे.
मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे.
मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात त्यांच्या हृदयात
मन्मथेन- भगवान कामदेवाने, मदनाने.
ए
कत्रित अर्थ पाहता जिच्या प्रभावामुळे मध्वरी भगवान विष्णूंच्या हृदयात मदनाला पहिल्यांदा स्थान मिळाले अशी.
आई महालक्ष्मी मुळेच भगवान विष्णूंचा मनात प्रथम प्रेमभाव निर्माण झाला अशी.
तिच्या शिवाय अन्य कोणत्याही स्त्रीला भगवान विष्णूच्या हृदयात स्थानच नाही आणि तिच्यामुळे पहिल्यांदाच भगवान विष्णूंच्या मनात प्रेमभाव निर्माण झाला असल्याने पहिले प्रेम रूपात भगवान विष्णूची अत्यंत प्रिय असणारी देवी लक्ष्मी. तिची ती अत्यंत प्रभावशाली दृष्टी, मन्थरम्- वळणदार. इतर वेळा या शब्दाचा अर्थ वाकडी असा होतो. आईच्या नजरेतील कटाक्ष वक्रता येथे अपेक्षित आहे.
ईक्षणार्द्धं- अर्धवट दृष्टी. अर्धोन्मिलित नेत्र कटाक्ष.
मन्दालसं – मंद अर्थात हळुवार. आलस अर्थात जडावलेली.
व्यक्ती जेव्हा भोजनादिक तृप्ती दायक गोष्टींनी तृप्त होऊन आपल्याच आनंदात रममाण असते त्यावेळी तिची दृष्टी अशी मंद आलस युक्त होते. आई महालक्ष्मी परम तृप्त असल्याने तिची दृष्टी अशी आहे. मकरालयकन्यकाया:- मकर म्हणजे मगर. समस्त जलचर प्राण्यांचे प्रतीक. त्यांचे आलय म्हणजे राहण्याचे स्थान अर्थात समुद्र. त्याची कन्या ती मकरालयकन्यका.
तिची ती प्रेमळ दृष्टी
मय्यापतेत्दिह- येथे माझ्यावर वर्षाव करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply