दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम- स्मिन्नकिञ्चन विहङ्ग शिशौ विषण्णे।दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:।।८।।
आई भगवतीच्या कृपादृष्टी वर्षावाचा विचार मनात आल्यानंतर पूज्यपाद आचार्यश्री त्या वर्षावाशी संबंधित अन्य गोष्टींचा विचार एकत्रित करून उपमासौंदर्य साधत आहेत.
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाह:- हा मेघ सामान्य नाही. आई जगदंबेच्या कृपादृष्टीचा हा मेघ. कशी आहे आई जगदंबा, तर नारायण प्रणयिनी. भगवान श्री विष्णूची प्रियतमा. त्यातही नारायण शब्द वापरणारी आचार्यश्रींची प्रतिभा अलौकिक.
नारा म्हणजे पाणी. त्यात जे अयन म्हणजे निवास करतात ते नारायण.
मेघ जरी जल वर्षाव करीत असला तरी ते जल मूलत: समुद्राचे.
त्या आदिमायेची कृपा मुळात मायापती परब्रह्माची. किती सहजरीत्या आचार्य हा सिद्धांत सांगताहेत.
दयानुपवनो- हा मेघ दया रुपी पवन म्हणजे वाऱ्याच्या मागोमाग येतो. अर्थात आधी आई जगदंबेच्या मनात भक्तांच्या प्रति दया भाव जागृत होतो आणि मग कृपादृष्टी रुपी मेघ अवतरित होतो.
अस्मिन्नकिञ्चन- आचार्य स्वतःला अकिंचन याचा अर्थ अन्य कोणताही मार्ग नसलेले म्हणत आहेत.
विहङ्ग शिशौ- मेघाचा विषय असल्यामुळे येथे विहंग म्हणजे पक्षी याचा संबंध चातकाशी आहे. त्यातही त्याचा शिशू अर्थात पूर्ण परावलंबी. विषण्णे- त्यामुळे दुःखी, हतबल झालेला.
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं- मेघ नसला की प्रचंड गर्मी होते. त्याचा त्रास होतो. तसा आईच्या कृपे पासून दूर असलेला जीव दुष्कर्म करतो. त्याचा परिणाम म्हणून दुःख रूपी घर्म अर्थात घाम येतो. तो दूर करून आईची दृष्टी,
दद्याद् द्रविणाम्बुधाराम- मला कृपा रुपी धनाची, शांत करणारी जलधारा प्रदान करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply