आमचं कुलदैवत. तसं आमचं जाणं फारच कमी होतं. जाण्याची इच्छा खूप असते, पण जमत नाही.
अगदी पहिल्यांदा जेव्हा आम्ही सगळे गेलो होतो, तेव्हा तिथे फारशा सोयी नव्हत्या. मी शाळकरी असतानाची गोष्ट. मंदिराच्या गुरुजींकडेच उतरावं लागायचं. अर्थात त्यांचं घर खूप विस्तारलेलं आणि खूप मोठ्ठं होतं. ते सगळं संस्थांनच्या मलकीचच होतं. श्री लक्ष्मीनृसिंह कुलदैवत असलेले महाजन तसे फारच थोडे असल्यामुळे इथे इतर देवस्थानांसारखी रहाण्या जेवण्याची सोय नव्हती आणि पुढे बऱ्याच वर्षांपर्यंत नव्हती. गुरुजींकडेच सोय करावी लागायची. दुसरी गोष्ट म्हणजे हे देवस्थान मुख्य रस्त्यापासून काहीसं आत आहे. फोंड्याहून पणजीच्या दिशेने जाताना मध्ये डाव्या हाताला हा वेलिंगचा फाटा लागतो. येणारे महाजन पूजा अभिषेक आटोपून मुक्कामाला दुसरीकडे जात असत. गुरुजींकडे रहाणं अनेकांना तसं थोडंसं अडचणीचं वाटायचं. अडचणीचं म्हणजे आकारमानाने नाही, तर privacyच्या दृष्टीने अडचणीचं. प्रातर्विधीसाठी एक तर त्यांचं घरातलं शौचालय वापरावं लागायचं अथवा देवळाच्या बाहेर एक शौचालय होतं ते वापरावं लागायचं. अर्थात काळोख पडल्यावर तिथे जाणं गैरसोयीचं होतं. आम्हाला त्यांनी पहिल्या मजल्यावर एक भली थोरली खोली राहायला दिली होती. सकाळच्या चहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं त्यांच्याकडेच व्हायचं. पहिल्या मजल्यावरून खाली आलं की डाव्या हाताला एक लांबलचक जेवणाची खोली होती. तिथे समोरासमोर पानं वाढली जायची. जेवणात पोळी मात्र नेहमी मिळायची नाही. वाफाळलेला भरपूर भात, सांबार किंवा आमटी, भाजी, लोणचं, पापड असा बेत असायचा. आंघोळीसाठी गरम पाणी त्यांचा माणूस आणून द्यायचा. मघा म्हटल्याप्रमाणे शौचालयाची फारच गैरसोय व्हायची. आता मात्र फार सुंदर सोय झालीय. बाहेरून देवळाकडे येण्याच्या वाटेवर एका बाजूला लहान लहान कॉटेज बांधलेले आहेत. देवळाच्या प्राकारात एका बाजूला स्वतंत्र सोयी असलेल्या खोल्या बांधून राहण्याची सोय केली आहे. पण अगदी मनापासून सांगायचं तर पूर्वीची ती गैरसोयीतली मज्जा आता येत नाही.
लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा. पूजा होईपर्यंत अकरा वाजायचे. दुपारच्या जेवणापूर्वी आरती होऊन देवाला नैवेद्य दाखवला जायचा, आणि अशा तऱ्हेने सकाळचा सोहळा संपायचा. दुपारच्या जेवणानंतर गाभाऱ्यापुढच्या सभामंडपात शांतपणे पाय सोडून बसण्याचा आनंद काही वेगळाच असायचा. थंड, शांतवणारी फरशी, आजूबाजुला दाटलेला सुगंधी दरवळ, प्रसन्न वातावरण, मध्येच गाभाऱ्याबाहेरील घंटेचा कुणा भाविकाने केलेला नाद. दुपार कशी टळून जायची कळायचही नाही. सायंकाळ झाली की मात्र खूप सुनं सुनं वाटायचं. मुंबईसारखी वर्दळ नाही. सारीकडे शांत, प्रत्येकजण आपल्या घरात. रात्रीचं जेवण आटोपून मंदिराच्या प्राकारात शांतपणे शतपावली घालायची आणि मग निवांत झोपून जायचं.
उत्सवाच्या काळात पालखी सुंदर सजवली जाते आणि देवाची मूर्ती त्यामध्ये विराजमान होते. देवळाभोवतालच्या प्राकारात ही पालखी जयघोष करत फिरवली जाते. देवळासमोरच्या तळीमध्ये दोन नावा परस्परांना जोडून आणि त्यावर तराफा ठेवून त्यात पालखी ठेवली जाते. नावांना दिव्यांची रोषणाई केली जाते. संपूर्ण तळ्यात पालखी फिरवली जाते. खरोखर नयनरम्य सोहळा असतो तो.
गाभाऱ्यासमोर उभं राहून श्री लक्ष्मीनृसिंहाच्या मूर्तीकडे भक्तिभावाने पाहिलं , की अष्ट्सात्विक भाव जागे होतात आणि नकळत हात जोडले जातात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् हे देवाचं रूप मनात साठवत परतीच्या मार्गाला लागतो.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply