यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥
फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत.
ते म्हणतात,
यः – जो कोणी, श्लोकपंचकम् इदं – हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला,
सौभाग्यदं – सौभाग्य दायक असलेला, सुललितं – लालित्यपूर्ण असलेला.
पठति प्रभाते- सकाळच्या वेळी पठण करतो.
तस्मै – त्याच्यावर ललिता झटिति प्रसन्ना – आई ललिता चटकन प्रसन्न होते.
आणि त्याला,
ददाति- प्रदान करते.
काय काय प्रधान करते ती सूची सादर करताना आचार्य श्री म्हणतात,
विद्यां – विद्या अर्थात अध्यात्मविद्या, मोक्षविद्या, आत्मज्ञान.
श्रियं- अर्थात वैभव विमलसौख्य- शुद्ध सुख. अर्थात इतर कोणाच्याही दुःखाला कारणीभूत न होणारे सुख.
सामान्य व्यवहारात माझे सुख कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, प्राध्यापक म्हणून मला सुख मिळायचे असेल असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाचे दुःख सहन करावे लागेल. मुलाला खाण्याचे सुख मिळायचे असेल तर आईला स्वयंपाक करण्याचे दुःख भोगावे लागते. त्यामुळे व्यवहारातील सुख निर्भेळ नाही. निर्भेळ सुख एकच. आत्मसुख. आईच्या कृपेने ते प्राप्त होते
अनन्तकीर्तिम्- कधीच न संपणारी कीर्ती.
हे अंतिम पद फार महत्त्वाचे आहे. जगात स्वार्थाने लोक समोर करतात ती स्तुती, प्रसिद्धी. पण आपल्या मागे लोक आपल्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ती कीर्ती. की खरी असते. कारण त्यात स्वार्थ नसतो.
आई ललितांबेच्या कृपेने साधकाला अशी कीर्ती प्राप्त होते. अशी कीर्ती मिळावी असे कार्य त्यांच्या हातून घडते. जी शाश्वत असते .चिरंतन असते.
त्यासाठी तिचे हे स्तवन आहे.
जय श्री ललितांबा !
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply