श्री मुदगल पुराणाचा प्रधान प्रतिपाद्य विषय आहे “स्वानंदयोग”. यासाठी त्यांनी चतुर्विध ब्रह्माचे वर्णन केले आहे.
असत् ,सत्, सम आणि नेति किंवा अव्यक्त अशा चार शब्दात साधकाच्या आत्मोन्नती चे चार स्तर वर्णिले आहेत.
जे जे उत्पन्न झाले ते ते नष्ट होते. या सगळ्यात तात्कालिक पदार्थांना असत् ब्रह्म असे म्हणतात. ती शाश्वत नसल्याने त्याला असत् म्हटले. पण या पदार्थांची ही मर्यादित शक्ती असल्याने यालाच शक्ती ब्रह्म असे म्हणतात.
या पदार्थांचे नश्वरत्व ज्या शक्तीने कळते त्या ज्ञानाला सत् ब्रह्म असे म्हणतात. ज्ञानाचा संबंध प्रकाशाशी असल्याने यालाच सूर्य ब्रह्म असे म्हणतात.
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.
तर चौथी अवस्था असते अव्यक्त ब्रह्म. असत् पासून सम पर्यंत काहीही अंतिम नाही हे येथे कळत असल्याने याला नेती असे म्हणतात. येथे सर्वस्वाचा विलय होत असल्याने याला शंकर ब्रह्म म्हणतात.
यातील तीन व्यक्त आणि एक अव्यक्त अशा चारही अवस्थांच्या एकत्रीकरणालाच गाणपत्य संप्रदायात “स्वानंद” असे म्हटले आहे.
या चार स्तरांवर उन्नत होत होत साधक शेवटी “स्वानंद” अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. या स्वानंद अवस्थेचे स्वामी असल्याने भगवान गणेशांना स्वानंदेश असे म्हणतात.
याचा रस स्तरांचे विविध अंगांनी केलेले निरूपण. त्यांच्या प्राप्तीचे आणि तेथे स्थिर होण्याचे मार्ग. त्यातून पुढील पुढील स्तरावरून न होण्याची साधने आणि सगळ्यात शेवटी अविचल अशा स्वानंद अवस्थेची प्राप्ती करून घेण्याच्या साधनेला स्वानंद योग असे म्हणतात.
हा स्वानंद योग स्थापित करणे हे श्री मुद्गल पुराणाचे प्रधान उद्दिष्ट आहे.
जय गजानन.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply