आत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत.
यापैकी आरंभीच्या आठ खंडात आठ विनायकांच्या कथा वर्णिलेल्या आहेत.
विविध आठ राक्षसांच्या निर्दालनासाठी हे अष्टविनायक प्रकट होतात.
श्रीमुद्गलपुराणाची प्रत्येकच गोष्ट लोकविलक्षण आहे. या आठ खंडात वर्णन केलेल्या आठ राक्षसांची नुसती नावे जरी ऐकली तरी आपल्याला मुद्गल पुराणाच्या वेगळेपणाची सहज जाणीव होईल.
श्रीमुद्गलपुराणाच्या पहिल्या खंडातला राक्षस आहे मत्सरासुर. दुसऱ्या खंडात राक्षस आहे मदासुर. तिसऱ्यात मोहासुर, चौथ्यात लोभासुर, पाचव्यात क्रोधासुर, सहाव्यात कामासुर, सातव्यात ममासुर तर आठव्या
खंडातील राक्षसाचे नाव आहे अहंकारासुर.
झालात ना आश्चर्यचकित? हेच या पुराणाचे वैशिष्ट्य आहे.
यापैकी एकाही राक्षसाचे नावही आजपर्यंत ऐकलेले नाही ना? तुम्ही म्हणाल हे राक्षस कुठे आहेत?हे तर आपल्या आत विद्यमान विकार आहेत. तर बरोबर आहे. या आपल्या आतल्या विकारांनाच श्रीमुद्गलपुराण राक्षस रूपात वर्णिते.
यातील सर्वच पात्रे अशी प्रतीकात्मक आहेत. म्हणजे मत्सरासुराचे पुत्र सुंदरप्रिय, विषयप्रिय. तर या राक्षसाची पत्नी मदिरा.
अन्य पुराणात वर्णन केलेले राक्षस हे बाहेरचे आहेत. ते कितीही भयानक असले तरी दृश्य आहेत. मात्र येथे आपल्या आत विद्यमान असणारे आणि अदृश्य विकार असुर रूपात वर्णिले असल्याने येथील संघर्ष अधिक कष्टसाध्य आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे आठ राक्षस आपल्यात विद्यमान असतील तर त्यांच्या नियमनासाठी प्रकट होणारे विनायक बाहेर कुठे असून कसे चालतील? तेही आतच विद्यमान आहेत.
आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply