हे आठही राक्षस अत्यंत घोर तपश्चर्या करतात. राक्षसी वृत्ती चे हेच वैशिष्ट्य आहे की ते स्वतः तर तप करतात पण इतरांच्या तपात विघ्न निर्माण करतात. उलट साधुसंत स्वतः तप करताना इतरांना साधनेला लावतात. मीच एकटा मोठा होईल दुसऱ्या कोणाला होऊ देणार नाही ही वृत्तीच राक्षसांची मूळ वृत्ती आहे.
तपश्चर्येमुळे वरदान द्यायला देवता आल्या की सर्व राक्षसांचे पहिले मागणे असते मृत्यू नसावा. निसर्गातील अनिवार्य असणार्या मृत्यूला टाळण्याची इच्छा करणे यालाच राक्षस म्हणतात.
तसा वर देवता देऊ शकत नाहीत कारण त्यांनाच कधी ना कधीतरी अंत आहे.
मग राक्षस, त्यातल्या त्यात तो मृत्यू अधिकाधिक कठीण करण्याचा प्रयत्न करतात. येथे कोणत्या राक्षसाने वरदान मागितले आहे की मला पंचमहाभूतांपासून मृत्यू नसावा. तर दुसरा कोणी वरदान मागतो जे जे दिसते, कळते त्याने मृत्यू नसावा. कोणी वरदान मागतो की मला त्रिगुणा पासून मृत्यू नसावा. कोणी वरदान मागतो की मन आणि वाणीने ज्याचे वर्णन करता येत अशाने मृत्यू नसावा.
थोडा शांत विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या वरदानात सर्व बाह्य गोष्टींचाच विचार केला आहे.
मृत्यू हे सर्वात मोठे दुःख आहे. अशीच सर्व दुःखे आणि ते नसण्याचे सुख ज्यांना बाहेरच जाणवते त्यांनाच राक्षस म्हणतात.
शास्त्र या कथांच्या माध्यमातून आपल्याला सांगू पाहते की सुख किंवा दुःख बाहेर नाही तर आत आहे.
आनंद हे ज्या परमात्म्याचे स्वरूप आहे तो आतला गवसला तरच खरे सुख मिळू शकते.
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.
आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply