नवीन लेखन...

श्रीपांडुरंगाष्टकम् – मराठी अर्थासह

वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम् भुजंगप्रयात वृत्तात गुंफलेले असून गावयासही सोपे आहे.


महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः ।
समागत्य तिष्ठंतमानंदकदं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥

मराठी- भीमा नदीच्या (चंद्रभागेच्या) तीरावर, महान योगाच्या क्षेत्री पुंडरीकाला वरदान देण्यासाठी श्रेष्ठ मुनींसह येऊन थांबलेल्या, आनंदाचा साठा असलेल्या, परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

उभा पुंडरीकास देण्यास दाना
विठू मोदसाठा सवे संत नाना ।
महायोगधामी भिमेच्या तिरासी
परब्रह्मरूपी भजू या तयासी ॥ १

 


तडिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥

मराठी- विजेप्रमाणे झळाळणारी वस्त्रे असणार्‍या, निळ्या घनांप्रमाणे अंगकांती असणार्‍या, जो लक्ष्मीचे सुंदर निवासस्थान आहे, स्वयंप्रकाशी आत्मज्ञान आहे, श्रेष्ठ असूनही पावलांखालील विटेवर दृढ उभ्या असलेल्या परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

जया वीज वस्त्रे, घनश्याम अंगी
रमाधाम, जो देखणा आत्मरंगी ।
विटेचा दृढाधार खाशा पदांसी
परब्रह्मरूपी भजू या तयासी ॥ २

 


प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥

मराठी- माझ्या (भक्तांसाठी) हा भवसागर (फक्त) इतका (कमरेपर्यंत खोल) आहे याचा दाखला म्हणून कंबरेवर हात ठेवलेल्या, ब्रह्मदेवाची वस्ती असलेला नाभीकोश (नाभीकमल) हाती धरलेल्या परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

कटी अंगुली हातही दाविताती
भवाब्धी कटी-खोल नाहीच जास्ती ।
तसे बोट नाभी-विरंची-गृहासी     (विरंची-ब्रह्मा)
परब्रह्म रूपा नमू विठ्ठलासी ॥ ३

 


स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥

मराठी- गळ्यात झळाळणार्‍या कौस्तुभ मण्याची माळ घालणार्‍या, ज्याच्या हातातील कडे लक्ष्मीला आवडते (ज्याच्या बाहूंवर बाजूबंद शोभत आहे), जो स्वतः लक्ष्मीचे सदनच आहे, कल्याणकारी, जो शांत, प्रशंसनीय,श्रेष्ठ असून जनांचा पालनकर्ता आहे, अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

झळाळे गळा हार हा कौस्तुभाचा
करी गोठ शोभे रमा आवडीचा ।
जनां शांत त्राता गुणी क्षेमकारी
परब्रह्मरूपी नमू हा मुरारी ॥ ४

 


शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रम्
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥

मराठी- शरदातील पूर्ण चंद्राप्रमाणे मुखावर सुंदर हास्य विलसत असणारा, चमचमणार्‍या कर्णभूषणांची आभा ज्याच्या गालांवर झळकत आहे, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल बिंब (तोंडले) फळासम ज्याचे ओठ आहेत, आणि ज्याचे नयन कमळाप्रमाणे आहेत, अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

शरच्चन्द्र जेवी मुखी हास्य साचे
कपोली तसे तेज ते कुंडलांचे ।
जणू नेत्र पद्मे, जपा वर्ण ओठी             (जपा – जास्वंद)
परब्रह्मरूपी नमू विश्वजेठी ॥ ५

 


किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥

मराठी- ज्याच्या शिरावरील मुकुटाच्या तेजाने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, स्वर्गीय अमूल्य रत्नांनी देवांनी ज्याची पूजा बांधली आहे, तीन ठिकाणी वाकून जो (बालकृष्णरूपात) उभा आहे, मोराचे पीस आणि माळांनी जो सजला आहे अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

शिरस्त्राण तेजे झळाळी दिशांना
जया किंमती वाहती देव रत्नां ।
त्रिवक्रा, सरा लेउनी मोरपीसा
परब्रह्मरूपा नमू मानिवासा ॥ ६ (मा- रमा,लक्ष्मी; मानिवास- लक्ष्मीनिवास,श्रीनिवास,विष्णू)

टीप- येथे तिसर्‍या चरणात ‘ त्रिभंगाकृती ’ या शब्दाने रांगणार्‍या बाळकृष्णाचे रूप अभिप्रेत असावे. कटीवर हात ठेऊन उभी पांडुरंगाची सरळ आकृती एक किंवा दोन ठिकाणी (कोपरात) वाकलेली आहे. परंतु रांगणारा बालकृष्ण मात्र ( खांदे, कंबर व गुडघे अशा) तीन ठिकाणी वाकलेला आहे.

 


विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां वृंदकानन्दनं चारुहासं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥

मराठी- जो सर्वव्यापी आहे, जो मुरलीवादन करत सर्वत्र संचार करतो, आपली लीला दाखवण्यासाठी ज्याने गोपालकाचा वेष धारण केला, जो गायींच्या कळपाला आनंद देतो, ज्याचे हास्य मधुर आहे, अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

फिरे सर्वव्यापी करी वेणुनादा
हसू गोड दे धेनुतांड्यास मोदा ।
लिला दाविण्या गोपवेषा स्विकारी
परब्रह्मरूपी नमू हा मुरारी ॥ ७

 


अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं
परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥

मराठी-  जो अजन्मा आहे, रुक्मिणीचा जीवनाधार आहे, जो (भक्तांसाठीचे) विश्रामाचे श्रेष्ठ ठिकाण आहे, जो जागृति, स्वप्न व सुषुप्ति यांच्यापलिकडील शुद्ध विरक्ती आहे, शरणागतांचे दुःख हरण करणार्‍या देवांच्याही देवाला, परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो.

सुखानंद, संजीवनी रुक्मिणीची
अजन्मा, विशुद्धी तुरीया स्थितीची ।
सुरांच्या सुरा दीनबंधू खुशाला
परब्रह्म रूपा नमू केशवाला ॥ ८


स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये
पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवाम्बोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले
हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

मराठी- जे लोक पांडुरंगाची ही पुण्यदायक स्तुती नेहेमी मनापासून आणि भक्तीने पठण करतात, ते भवसागर तरून जाऊन अंतकाळी चिरस्वरूपी श्रीहरीच्या स्थानी पोहोचतात.

स्तुती विठ्ठलाची सदा पुण्यदात्री
मनापासुनी भक्तिने गीत गाती ।
भवाब्धी तरोनी असे लोक जाती
हरीच्या घरी पोचती जीवनांती ॥ ९

| इति श्री शंकराचार्य विरचितं पांडुरंगाष्टकं संपूर्णम् |

********

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

6 Comments on श्रीपांडुरंगाष्टकम् – मराठी अर्थासह

    • अतिशय सुंदर रुपांतर मना पासून आवडल गुरुदेव दत्त

  1. अत्यंत सुंदर……मनापासून काव्यानुवाद आवडला.

  2. खूपच सुंदर आणि परफेक्ट केलं आहे तुम्ही मराठीत भाषांतर केलं आहे…
    बरोबर लय पकडून पण शब्दांचे अर्थ व शब्द सौंदर्य जपत जपत फारच छान भाषांतर केलंय ..पांडुरंगाची कृपाच म्हणायची अजून काय ??????

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..