तुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे.
तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली.
जगद्धात्रि नमस्तुभ्यं विष्णोश्च प्रियवल्लभे ।
यतो ब्रह्मादयो देवाः सृष्टिस्थित्यन्तकारिणः ॥१॥
मराठी- जगाचा आधार व विष्णूची प्रिय पत्नी असलेल्या (तुलसी), जिच्यामुळे ब्रह्मदेवादिक देव जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय सांभाळतात, तुला नमस्कार असो.
जगाधार तुला वंदू विष्णूची प्रिय देवता ।
जेणे ब्रह्मादि सांभाळी उत्पत्ती स्थिति शेवटा ॥ ०१
नमस्तुलसि कल्याणि नमो विष्णुप्रिये शुभे ।
नमो मोक्षप्रदे देवि नमः सम्पत्प्रदायिके ॥२॥
मराठी- हे विष्णूच्या आवडत्या, कल्याणकारी मंगल तुळशी तुला नमस्कार असो. ऐश्वर्य दान करणा-या व मोक्ष मिळवून देणा-या देवी तुला नमस्कार असो.
मंगले हितकारी तू विष्णूला प्रिय, शोभना । (शोभना- तुळस)
देसी मुक्ती नि संपत्ती, तुजला मम वंदना ॥ ०२
तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भ्योऽपि सर्वदा ।
कीर्तितापि स्मृता वापि पवित्रयति मानवम् ॥३॥
मराठी- जिची कीर्ती वर्णन केल्यावर किंवा नुसती आठवण काढली तरी, जी मनुष्याला पावन करते, ती तुलसी सर्व संकटांपासून माझे सदैव रक्षण करो.
संकटातुन राखी तू सदा वृंदा मला, करी (वृंदा- तुळस)
जनां पाक, गुणां गाता मनी आठव वा जरी ॥ ०३ (पाक-पावन)
नमामि शिरसा देवीं तुलसीं विलसत्तनुम् ।
यां दृष्ट्वा पापिनो मर्त्या मुच्यन्ते सर्वकिल्बिषात् ॥४॥
मराठी- जिची काया झळाळत आहे, जिला पाहताच पातकी मर्त्य प्राण्यांस सर्व दुष्कृत्यांपासून मुक्ती मिळते त्या देवी तुळशीला, मी माथा लववून नमस्कार करतो.
तेजस्वी तनु कृष्णेची नतमस्तक वंदिता । (कृष्णा- तुळस)
पापांपासून हो मुक्ती मर्त्यांची सर्व, पाहता ॥ ०४
तुलस्या रक्षितं सर्वं जगदेतच्चराचरम् ।
या विनिहन्ति पापानि दृष्ट्वा वा पापिभिर्नरैः ॥५॥
मराठी- हे सर्व सजीव व निर्जीव जग तुळशीने राखले आहे जी, पापी लोकांनी तिचे दर्शन घेतल्यावर, त्यांच्या सर्व पापांचा नाश करते.
चलाचल जगा सा-या राखी तुळस, पाहता ।
जिला, पापे दुरात्म्यांची नष्ट होतात सर्वथा ॥ ०५
नमस्तुलस्यतितरां यस्यै बद्ध्वाञ्जलिं कलौ ।
कलयन्ति सुखं सर्वं स्त्रियो वैश्यास्तथाऽपरे ॥६॥
मराठी- अत्यंत श्रेष्ठ अशा तुळशीला जे हात जोडून नमस्कार करतात ते, स्त्रिया, वैश्य आणि इतर सारे कलियुगी सुखाने (सर्व गोष्टी) साध्य करतात.
वैकुण्ठ श्रेष्ठ अत्यंत हात जोडून वंदिती । (वैकुण्ठ- तुळस)
कलीयुगी वर्ण सारे सुखें उत्कर्ष साधिती ॥ ०६
टीप- काही ठिकाणी ‘बद्ध्वाञ्जलिम्’ ऐवजी ‘ बद्ध्वा बलिम्’ असा पाठभेद आढळतो. परन्तु त्याचा अर्थ लावणे दुरापास्त होते.
तुलस्या नापरं किञ्चिद् दैवतं जगतीतले ।
यथा पवित्रितो लोको विष्णुसङ्गेन वैष्णवः ॥७॥
मराठी- या पृथ्वीतलावर तुळशीखेरीज दुसरे कोणतेही दैवत नाही जे, श्री विष्णूच्या सहवासाने जसे वैष्णव तसे, सर्व जनांना पावन करते.
विष्णु जेवी वैष्णवांना, पवित्र जगता करी
वृन्देविना न देवी या दुसरी धरतीवरी ॥ ०७
तुलस्याः पल्लवं विष्णोः शिरस्यारोपितं कलौ ।
आरोपयति सर्वाणि श्रेयांसि वरमस्तके ॥८॥
मराठी- या कलियुगात विष्णूच्या मस्तकावर वाहिलेलं तुळशीचं पान (भाविकाच्या) माथ्यावर सर्व लाभाच्या गोष्टी प्रस्थापित करतं.
वाहता पान वृंदेचे विष्णुमाथा कलीयुगी ।
लाभदायक गोष्टींची भक्तमाथ्यावरी सुगी ॥ ०८
तुलस्यां सकला देवा वसन्ति सततं यतः ।
अतस्तामर्चयेल्लोके सर्वान् देवान् समर्चयन् ॥९॥
मराठी- तुळशीमध्ये सर्व देवांचा नित्य अधिवास असतो, म्हणून या जगती सर्व देवांची पूजा करण्यासाठी तुळशीची पूजा करावी.
वसती सर्व देवांची ’सुगंधी’ त सदा असे । (सुगंधी- तुळस)
जगी देव पुजेसाठी वृंदापूजन योग्यसे ॥ ०९
नमस्तुलसि सर्वज्ञे पुरुषोत्तमवल्लभे ।
पाहि मां सर्वपापेभ्यः सर्वसम्पत्प्रदायिके ॥१०॥
मराठी- हे सर्व काही जाणणा-या आणि विष्णूची पत्नी असणा-या तुळशी, तुला नमस्कार असो. (भक्तांना) सर्व प्रकारची संपत्ती देणा-या देवी, मला सर्व पापांपासून संरक्षण दे.
वृंदेला जाणत्या वंदू कान्ता जी केशवा असे ।
दुष्कृत्यां दूर ठेवूनी सर्वां संपत्ति देतसे ॥ १०
इति स्तोत्रं पुरा गीतं पुण्डरीकेण धीमता ।
विष्णुमर्चयता नित्यं शोभनैस्तुलसीदलैः ॥११॥
मराठी- पूर्वी, हे स्तोत्र नेहेमी शोभिवंत तुळशीच्या पानांनी विष्णूचे पूजन करताना विद्वान पुण्डरीकाने गायले.
नित्य या गायिले गीता पुण्डरीकें त्रिविक्रमा ।
पूजिता गंधपत्रांनी शोभिवंत नि उत्तमा ॥ ११ (गंधपत्रा- तुळस)
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी ।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमनःप्रिया ॥१२॥
लक्ष्मीप्रियसखी देवी द्यौर्भूमिरचला चला ।
षोडशैतानि नामानि तुलस्याः कीर्तयन्नरः ॥१३॥
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत् ।
तुलसी भूर्महालक्ष्मीः पद्मिनी श्रीर्हरिप्रिया ॥१४॥
मराठी- तुळस, श्री, महालक्ष्मी, विद्या, अविद्या, यशस्विनी, धर्म्या (धर्माचे अधिष्ठान असणारी), धर्मानना (धर्माचा चेहेरा असणारी), देवी, देवीदेवमनप्रिया (देवी आणि देवांची आवडती), लक्ष्मीप्रियसखी, द्यौ (स्वर्ग), भूमी, अचला (स्थिर), चला (अस्थिर), अशी तुळशीची सोळा नावे पठण करणारा माणूस थोर भक्त होतो आणि शेवटी विष्णूच्या चरणी पोहोचतो. तुळस, भू, महालक्ष्मी, पद्मिनी, श्री, हरिप्रिया (अशीही तुळशीची नावे आहेत). ॥ १२, १३, १४ ॥
अविद्या तुलसी विद्या महालक्ष्मी यशस्विनी ।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमनप्रिया ॥ १२
लक्ष्मीप्रियसखी नि द्यौ श्री भूमी अचला चला
तुळशीची अशी सोळा नावे घेताच त्याजला ॥ १३
थोर भक्ती मिळे थारा अंती विष्णुपदी तया
तुलसी भू महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया ॥१४॥
टीप- या श्लोकांत किंचित गडबड दिसते. तुळशीची सोळा नावे असे श्लोकात म्हटले आहे, पण प्रत्यक्षात पंधराच नावे आहेत. देवी हे नाव दोनदा आले आहे.
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥१५॥
मराठी- हे लक्ष्मीची मैत्रीण असलेल्या, पावन, पापांचा नाश करणा-या, पुण्यप्रद, नारद मुनी जिची स्तुती करतात, विष्णूच्या मनातल्या आवडत्या तुलसी, तुला माझा नमस्कार.
रमासखि शुभे वंदू पुण्यदे अघनाशिनी ।
मनास हरिच्या भावे, स्तुतिगानी रमे मुनी ॥ १५
॥असे हे पुण्डरीकाने रचलेले तुलसी स्तोत्र समाप्त ॥
*********************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
सुंदर भाषांतर आहे.खरेतर मेळ मराठी स्तोत्र असावे असेच वाटते.
अतिशय छान. खरंतर धनंजय बोरकरांनी मराठीत रचलेल्या तुलसी स्तोत्राचे संस्कृत रूपांतर छान आहे असे म्हणावे लागेल!
फारच भाषांतर