नवीन लेखन...

श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, अलिबाग

वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.

या वृध्दाश्रमाचा परिसर अतिशय रमणीय असून भोवताली जवळपास १ एकर क्षेत्राची बाग आहे. सकाळी या वृध्दाश्रमाची व आजूबाजूच्या आल्हाददायक परिसराची साबणाच्या पाण्याने स्वच्छता केली जाते. वृध्दांच्या करमणुकीसाठी इथे कॅरम बोर्ड, टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे व अनेक दुर्मिळ मासिकांचा खजिना उपलब्ध आहे. येथील पाळीव कुत्रा तर सर्व आजी-आजोबांचा लाडका असून, काही हौसी सदस्य या कुत्र्याला दररोज अंघोळ घालतात. प्रत्येक दिवशी सकाळी या वृध्दांच्या कपडयांची नीट स्वच्छता केली जाते, व दर चार दिवसांनी त्यांची अंथरुणं व पांघरुणं कोमट पाण्याने धुतली जातात.

येथील चार सदस्य विकलांग आहेत. या सर्व सदस्यांचे आपापसात ग्रुप पाडून दिले गेले आहेत. या ग्रुपमधले सदस्य एकमेकांची अगदी मनापासून काळजी घेतात, एखाद्याने औषध किंवा गोळी घेतली नसेल तर आठवण करतात, आपल्या ग्रुपमधील सदस्याला नाश्ता किंवा चहा मिळाला नसेल किंवा त्याला कुठला त्रास होत असेल तर लगेच केअर टेकरला कळवतात. चालत्या फिरत्या वृध्दांना संध्याकाळी बागेत कमी कष्टांची कामे करायला परवानगी दिली जाते, काही जण पाय मोकळे करायला फेरफटका मारायला निघतात तर मग इतरांचे गप्पांचे फड रंगतात. या सर्व वृध्दांच्या बोलण्यात आजूबाजूच्या प्रसन्न वातावरणाचा परिणाम म्हणा किंवा गुजाळांच्या सांभाळण्याच्या पध्दतीचा परिणाम म्हणा, परंतु एक आशावाद डोकावत असतो. गुंजाळ ज्या पध्दतीने या सर्वांशी संवाद साधतात, किंवा त्यांची काळजी घेतात, त्यावरून आपलीसुध्दा कोणालातरी गरज आहे अशी खात्रीच त्यांना पटते आणि ही भावनाच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची असते.गुंजाळ जेव्हा जेव्हा अलिबागला जातात, तेव्हा येताना काहीतरी गोडधोड किंवा पुरणपोळी आणतात. त्यामुळे ते जेव्हा आश्रमात येणार असतात तेव्हा सर्वांच्या मनाला हुरहुर लागलेली असते.

इथल्या वृध्दांचा आणखी एक विरंगुळा म्हणजे घराभोवती पसरलेल्या प्रशस्त हिरव्यागार बागेला पाणी घालणे. या बागेला पाणी घालण्यासाठी येथील सदस्यांची नेहमीच चढाओढ लागते. या वृध्दाश्रमाच्या वरतीच डॉ. रमेश मालपाणींचा दवाखाना आणि घर आहे. त्यामुळे येथील वृध्दांच्या आरोग्याची चिंता फारशी कुणालाच नसते. या वृध्दाश्रमाच्या दिवाणखान्यातच मोठ कपाट आहे. ज्याच्यात औषधे, गोळया, व्हिटॅमिन्सचे ड्रॉप्स, बिस्कीटे, व इंजेक्शन्स् यांची दाटी असते. गुंजाळ स्वतः या वृध्दांना त्यांच्या ठरलेल्या गोळया, बिस्कीटे, व इंजेक्शन्स् देतात. आहारामध्ये डाळ, भाजी, भात, ताक, चपाती अशा सकस पदार्थांचा समावेश असतो. याशिवाय सतत चहा, पन्हे, वेगवेगळी सरबते यांच्या सरबराईने उन्हाची काहीली कमी केली जाते. एकमेकांमध्ये जिव्हाळयाच घट्ट नातं तयार झाल्यामुळे व बरेच वृध्द हे समदुःखी असल्याने त्यांच्यामधील चर्चांना कायम उत आलेला असतो. येथील सदस्यांना निरनिराळे छंद आहेत. काही जण उत्तम बासरी वाजवतात, तर एका वृध्दाने इथे भरपूर लिखाण करुन ठेवलं आहे. नरेंद्र तोरस्कर नावाचे माजी सदस्य छोटया छोटया डॉक्यूमेंटरीज व स्क्रीप्टस् इथेच लिहायचे. गोखले आजी या सुध्दा एक माजी सदस्या इतक्या गोड आवाजात गाणी म्हणायच्या की सगळा आश्रम मंत्रमुग्ध होऊन जायचा, व दिवसभर केलेल्या कष्टांचा सगळयांना विसर पडायचा.

कधीही कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम किंवा लग्न, मुंज, वाढदिवस असे सामुहिक कार्यक्रम असतील तर गुंजाळ या वृध्दमंडळीनासुध्दा त्यांच्या आनंदात सहभागी करुन घेतात. सर्व प्रकारचे सण इथे मोठया धडाक्यात साजरे केले जातात. दिवाळीला अलिबागचे काही डॉक्टर या आश्रमाला भेट देऊन इथल्या मंडळींची चौकशी करतात आणि त्यांना १० दिवस पुरेल एवढा फराळ आणतात. या आश्रमात अनेक सरकारी कार्यक्रमसुध्दा घेतले जातात. पंचायत समितीचे कार्यक्रम, कृषी खात्याचे कार्यक्रम किंवा रामकृष्ण मिशनचे कार्यक्रम जेव्हा इथे रंगतात, तेव्हा सर्वांचीच काही तासांची करमणुक होते. दसर्‍यामध्ये पेझारीच्या काही उत्साही महिलांचा नाच असतो.

जेव्हा सुरुवातीला सदस्य इथे येतात तेव्हा ते अतिशय निराश, खिन्न व काहीसे चिडचिडे झाले असतात. काहीजण नीट अन्न किंवा औषधे घेत नाहीत. अशावेळी त्यांच्यापुढे इतरांची दुःख व वेदना ठेवल्या जातात, व कोणाचं सुखं किंवा दुःखं मोठं आहे हे त्यांना विचारल जातं. सुरूवातीला अतिशय शांत असणारे सदस्य नंतर इतके खुलतात व मिश्कील बनतात की विचारायलाच नको! दिल खुलासपणा शिकवणारी व सर्वांना आदराने वागवणारी ही संस्था म्हणजे प्रत्येक वृध्दांच हक्काच असं घर आहे. चळवळया स्वभाव असणार्‍या काही वृध्दांना तर पानांची टपरीसुध्दा काढून दिली जाते! अगदी गरीब किंवा कुठल्याही मोठया संकटांमधून इथे दाखल झालेल्या वृध्दांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.

— अनिकेत जोशी

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..