दत्तात्रेयांचे प्रातःस्मरणीय चतुर्थ अवतार म्हणून प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांनी अत्यंत करुणामय अंतःकरणाने कलिकाळग्रस्त भ्रमित, दुःखित जनांच्या कल्याणार्थ “सत्यदत्तव्रत” प्रकट केले आहे. हे एक महान प्रभावशाली व समस्त दुःख अरिष्टनाशक दिव्या अस्त्रच आहे. या व्रताच्या अनुष्ठानाने आजवर अनेक जीव सुखी झालेले आहेत. व अजूनही होत आहेत. वास्तविक पाहता, परकीयांच्या हिंदुस्थानात राज्य स्थापने नंतर वैदिक धर्मीय लोकांच्या मनावर त्यांच्या आचारविचारांचा पगडा बसून, ते स्वधर्म विसरून गेले होते. इतकेच नव्हे तर ते स्वधर्माचा तिरस्कार करू लागले होते. हि धर्माची ग्लानी नाहीशी करण्यासाठी प. प. स्वामीमहाराजांचा अवतार झाला होता. त्याचबरोबर आपल्या धर्मातील अध्यात्मज्ञान व कर्मकांड सध्याच्या काळातील सामान्य लोकांना झेपणे कठीण आहे हे ओळखून, त्यांना भक्तिमार्गाकडे वळवणे; विशेषतः श्रीदत्तभक्तिकडे वळवणे; हेही त्यांच्या अवताराचे एक प्रयोजन होते. त्यामुळेच त्यांनी माणगावला श्री दत्तमंदिराची स्थापना करून, स्वतःच्या श्रध्दाभक्तिमय आचरणाने लोकांना भक्तीची पराकाष्ठा दाखवून दिली. याखेरीच भारतभर फिरून ठिकठिकाणच्या श्रीदत्तमंदिरात पूजेचे, सेवेचे आदर्श घालून दिले. शिवाय श्रीदत्त भक्तीपर स्तोत्रे व वाङ्मय विपुल प्रमाणात निर्माण केले.
यापैकीच सत्यदत्तव्रतपूजा आहे. हि पूजा संगण्यामागे स्वामीजी चा उद्देश हाच असावा कि सर्वसामान्यांना व्रतवैकल्ये करणे आवडते. या काळात श्री सत्यनारायण व्रत भाविकात प्रचलित होते. शिवाय हे भाविक विशिष्ट देवतेचीच उपासना करीत. द्वैतभावात वावरणारे हे भाविक, सर्व देवता एकाच परमात्म्याची रूपे असूनही आपले उपास्य दैवतच श्रेष्ठ मानीत. त्यामुळेच गणेश भक्तांसाठी ‘सत्य विनायक व्रत’ शिवभक्तासाठी ‘सोमवारव्रत’ अशी निरनिराळी व्रते प्रचलित झाली. त्याप्रमाणे श्री दत्तभक्तांसाठी अशाच प्रकारचे एखादे व्रत तयार करावे अशी दत्तप्रभूंची आज्ञा झाल्यामुळे प. प. महाराजांनी या व्रताची रचना केली असावी.
या व्रतातील पूजेचा भाग इतर व्रताप्रमाणेच आहे. यातील वैदिक मंत्र इतर व्रतात असलेलेच आहेत पण पुराणोक्त मंत्र श्री स्वामी महाराजांनी स्वतः तयार केलेले आहेत. म्हणून पूजाविधी सांगणाऱ्या पुरोहितास बोलावून वेदोक्त व पुराणोक्त मंत्रांनी शास्त्रोक्त पूजा करून घ्यावी. माहिती साठी पूजा साहित्याची खालील प्रमाणे व्यवस्था करावी;
हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, रांगोळी, गहू, तांदूळ, विड्याची पाने, खडीसाखर, पाच फळे, उदबत्ती, कपूर, निरांजन, समई, चौरंग, यज्ञोपवीत, वस्त्र, फुले, तुळशी, पंचपल्लव, दुर्वा, प्रसाद नैवेद्य, साखर, गव्हाचा रवा, तूप, दूध (सव्वापट प्रमाण), वेलदोडे, केशर, बेदाणा, बदाम, इत्यादी प्रसादात घालावेत. इतर गोष्टी तांब्या, कलश दोन, ताम्हणे दोन, पळी, भांडे, पंचामृत- दूध, दही, तूप, मध, साखर, अत्तर, उष्णोदक, दक्षिणा.
या व्रतात तीन कथा आलेल्या आहेत. पहिली कथा एका अनामिक मुमुक्षु ब्राह्मणांची असून त्याला दत्त प्रभुनी दर्शन देऊन, ‘मुक्तीसाठी काय करावे?’ हे सांगितलेले आहे. दुसरी कथा आयु राजाची असून त्याने सत्यदतव्रत केल्याने त्याला पुत्र होऊन त्याच्यावरील संकटे दूर झाल्याचे वर्णन आहे. तिसऱ्या कथेत हरिशर्मा नावाच्या ब्राम्हण कुमाराचे अनेक रोग या व्रताच्या प्रभावाने बरे झाल्याचे वर्णन आहे. शेवटी, शौनकादीक ऋशिनीही हे व्रत केल्याने दत्तप्रभुनी त्यांना दर्शन दिल्याचे वर्णन आहे. या कथा सांगताना स्वामी महाराजांनी स्वधर्माचरण व ईश भक्ती यावर भर दिलेला आहे. हाच इतर व्रताहून वेगळा असा कथेचा विशेष आहे.
व्रतकर्त्यान तीळ आवळ्याचे चूर्ण अंगाला लावून स्नान करावे. नंतर धुतलेली शुभ्र वस्त्रे किंवा सोवळे नेसून पवित्र स्थानी यावे. पूजेचे सर्व साहित्य तयार करून पुजास्थानी आणावे. पूजेच्या ठिकाणी चौरंगाभोवती रांगोळ्या काढाव्यात. शक्य असल्यास चौरंगाला, कर्दळी बांधाव्यात. वर छताला आंब्याचे डहाळे बांधावे. तुपाचा दिवा लावावा. प्रथम देवांना व वडील मंडळींना नमस्कार करून आसन ग्रहण करावे.५ स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून घ्यावे. नंतर नित्य देवपूजेप्रमाणे सत्यदत्त पूजेचा संकल्प सोडावा. यानंतर एका ताम्हणात तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेऊन प्रथम गजाननाचे षोडशोपचारे पूजन करून नित्यपूजेप्रमाणे आसन विधी, शडगन्यास व कलश, शंख, घंटा, दिवा यांची गंध, पुष्प, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी. त्यानंतर मंत्राने पुजासाहित्य व शरीर शुद्धी करावी. त्यानंतर खालील क्रमाने पूजा करावी.
१) महागणपती पूजन
२) वरुण स्थापनपूजन, वरुण पूजन
३) पुण्याह वाचन
४) दिक्पाल स्थापना
५) सत्यदत्तपूजा
६) मंत्रपुष्प व राजोपचार
७) प्रार्थना
८) दकाराद्यष्टोत्तरशत नामावली
९) सत्यदत्त पोथी कथा वाचावी
हि पूजा अत्यंत प्रभावी असून या व्रताच्या प्रभावे चारी पुरुषार्थ साध्य होतात.
श्री गुरुदेव दत्त!
— पाध्येकाका.
वसई.
Leave a Reply