ललामाङ्कफालां लसद्गानलोलां
स्वभक्तैकपालां यशःश्रीकपोलाम् ।
करे त्वक्षमालां कनत्प्रत्नलोलां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥३॥
ललामाङ्कफालां- आई जगदंबेने आपल्या ललाम अर्थात कपाळावर कुंकुमाची चंद्रकोर रेखाटली आहे. त्यामुळे तिला ललामाङ्कफाला असे म्हणतात.
लसद्गानलोलां- गायनाची लीला ऐकत राहणे आईला सर्वाधिक आवडते. गायन हे आनंदाचे
सहज प्रगटीकरण. आई जगदंबा अखंड आनंदात असते. आपल्या भक्तांना ती हा आनंद प्रदान करते. त्या आनंदात ते भक्त तिची स्तुती गात असतात.
स्वभक्तैकपालां- जी जगदंबा स्वतःच्या भक्तांची एकमात्र पालक असते, तिला स्वभक्तैकपाला असे म्हणतात. एकमात्र पालक याचा अर्थ आई शारदांबेच्या भक्ताला कोणतीही गोष्ट मागण्यासाठी अन्य कोणाकडे जाण्याची आवश्यकताच नसते. ही एकटीच सर्वकाही प्रदान करते.
यशःश्रीकपोलाम् – श्री शब्दाचा अर्थ आहे वैभव,सौंदर्य. कपोल शब्दाचा अर्थ आहे गालाच्या वरील उंचवटे. आरोग्यपूर्णता , यशप्राप्ती किंवा लज्जा या कारणांनी येणाऱ्या लालीने त्या कपोलांचे सौंदर्य वृद्धिंगत होते. आई जगदंबेच्या प्रत्येक कार्यात तिला यश प्राप्त होत असते. पराभवाचा, अपयशाचा संबंधच नसतो. यशामुळे तिचे हे सौंदर्य कायमच खुलून दिसते.
करे त्वक्षमाला- जप करण्यासाठी हातात जी छोटी माळ धारण करतात तिला अक्षमाला असे म्हणतात. आईने अशी माळ हातात धारण केली आहे.
कनत्प्रत्नलोला- जिच्या सहज लीलांनी नवीन परंपरा निर्माण होतात अर्थात बाकी सगळ्यांना तसे वागावे वाटते तिला कनत्प्रत्नलोला असे म्हणतात.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम्- अशा त्या माझ्या अत्यंत श्रेष्ठ शारदांबेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply