भवाम्भोजनेत्राजसम्पूज्यमानांलसन्मन्दहासप्रभावक्त्रचिह्नाम् ।
चलच्चञ्चलाचारुताटङ्ककर्णां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥८॥
भवाम्भोजनेत्राजसम्पूज्यमाना- आई जगदंबे च्या परमपूज्यत्वाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे तिच्या त्रिदेव पूज्यत्वाचा उल्लेख करीत आहेत.
भव, अंबुजनेत्र आणि अज अशा तीन शब्दात आचार्य श्री या तिघांचे वर्णन करतात.
भगवान शंकरांना भव असे म्हणतात. त्यांच्यासोबत असल्यामुळे आदिशक्तीला भवानी म्हणतात. भवंभवानी सहितम नमामि ! यामध्ये आपण तो उल्लेख करतो.
अंबुजनेत्र म्हणजे ज्यांचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत असे. हे वर्णन कोणत्याही देवाला लागू शकते. पण येथे आधी शंकर आणि नंतर ब्रह्मदेव असल्यामुळे हे भगवान विष्णूंसाठी आहे.
अज म्हणजे भगवान ब्रह्मदेव.
या ब्रह्मा-विष्णू-महेश्वरांकडून पूजिल्या जाणारी ती भवाम्भोजनेत्राजसम्पूज्यमाना.
लसन्मन्दहासप्रभावक्त्रचिह्ना- फुललेल्या मंद हास्यामुळे आई जगदंबेच्या मुखकमलावर तेज विलसत असते त्यामुळे तिला लसन्मन्दहासप्रभावक्त्रचिह्ना असे म्हणतात.
चलच्चञ्चलाचारुताटङ्ककर्णा- चलत् आणि चंचल हे दोन्ही शब्द हालचालींचे द्योतक आहेत. मग दोन शब्द का वापरले? तर त्यातून आचार्यश्री सातत्यपूर्ण हालचाल दाखवीत आहेत. एक तर आई जगदंबा चालत आहे किंवा बसल्याजागी आपल्याच आनंदात डुलत आहे. या दोन्ही अवस्थेत आईच्या कानात असणारे ताटंक अर्थात लोंबत असणारी कर्णफुले त्या हालचाली सोबत अत्यंत चारू म्हणजे मनोहर रूपात हालचाल करीत आहेत. अशा हालचाल करणाऱ्या कानातील ताटंकाने युक्त ती चलच्चञ्चलाचारुताटङ्ककर्णा.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम्- अशा अत्यंत श्रेष्ठ आई शारदांबेचे मी भजन करतो.
जय श्री शारदांबा !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply