गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं
चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् |
कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं
शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖
भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत.
कसे आहेत हे भगवान गणेश?
गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत आहे. कोणतीही गोष्ट तेव्हाच ओसंडून वाहते, ज्यावेळी ती आत परिपूर्ण भरलेली असते.
मिलद्भृंगषंडं- अशा या मदमत्त गंडस्थळावर मुनी मानसरूपी भुंग्यांचा समुदाय सतत एकत्रित येऊन गुंजारव करीत असतो.
चलच्चारुशुंडं- भगवान गणेशांचा सगळ्यात आगळावेगळा अवयव म्हणजे ज्यांची सोंड. तिची हालचाल चारू म्हणजे अत्यंत आकर्षक आहे. जगत्त्राणशौंडम् – असे हे भगवान गणेश संपूर्ण विश्वाचे संरक्षण करण्याच्या सामर्थ्याने युक्त स्वरूपात, शौंड आपल्याच आनंदात डुलत आहेत.
कनद्दंतकांडं- भगवान गणेशांच्या दातांवर जी आभूषणे लावली आहेत त्यांना छोटी छोटी घुंगुरे लावली असल्याने त्याचा आकर्षक किण् किण् आवाज होत आहे.
विपद्भंगचंडं- ही भगवान गणेश सर्व विपत्तींचा विनाश करण्याच्या बाबतीत चंड अर्थात प्रचंड सामर्थ्य संपन्न आहेत.
शिवप्रेमपिंडं – ते भगवान शंकरांच्या प्रेमाचा जळून एकत्रित आविष्कार आहेत. जसे एखाद्या पिंडात म्हणजे गोळ्यात तो एकच पदार्थ ठासून भरलेला असतो तसे भगवान शंकरांचे सर्व प्रेम श्री गणेश यांच्या ठिकाणी परिपूर्णरीत्या एकवटले आहे.
भजे वक्रतुंडम् – अशा भगवान वक्रतुंडांचे मी भजन करतो.
वक्र असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे अक्षरश: फुंकरीने उडवून लावतात त्यांना श्री वक्रतुंड असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply