स्तुतिं – हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
अर्चां – आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
यथावद्विधातुं – याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
महेशावलंबे – हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् – यमराजां पासून प्राण वाचवणार्या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply