दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि – मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् – मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् – हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply