त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
क्षणं – क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
क्ष्मा च – पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
लक्ष्मीः – अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
स्वयं तं वृणाते – स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
त्या देखील कशा? तर-
किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
कलाची- बाहुभूषणे.
गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
विशेषैः – या सगळ्या विशेष आभूषणांसह.
अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply