यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
ते म्हणतात,
यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
कालवाह – म्हणजे भगवान यमराजांच्या
द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः – भीषण अशा प्रकारचा आवाज.
तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
वृषाधीशमारुह्य – वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
वत्स – हे भक्ता !
मा भीरिति – घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
प्रीणय त्वम् – आपण मला प्रसन्न करा.
ही तुलनाच मोठी रम्य आहे.
आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply