यदा दारुणाभाषणा भीषणा मे
भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖
जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,
यदा – ज्यावेळी
दारुणाभाषणा – अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
भीषणा – अत्यंत भयानक असणारे,
कृतांतस्य दूताः – यमराजांचे दूत,
मे- माझ्या,
भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
तदा- यावेळी
मन्मनस्- माझे मानस,
त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
नमस्तेऽस्तु शंभो – हे शंकरा! आपणास वंदन असो.
असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply