यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖
मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.
यदा – ज्यावेळी
दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
निश्वसन्- धाप लागली असताना,
नि:सृताव्यक्तवाणिः – अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
तदा- त्यावेळी जह्नुकन्या – राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
जलालंकृतं – तिच्या जलाने अलंकृत झालेले,
ते- आपले
जटामंडलं- जटेचा विस्तार,
मन्मनोमंदिरे स्यात् – माझ्या मंदिरात स्थिर असावा.
अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply