यदा यातनादेहसंदेहवाही
भवेदात्मदेहे न मोहो महान्मे |
तदा काशशीतांशुसंकाशमीश
स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖
मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत.
येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात,
यदा – ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी,
यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा शब्द किती अद्वितीय आहे.
ते आपल्या शरीराला यातना देह म्हणत आहेत. अर्थात या देहात जीवाला असंख्य यातनाच भोगाव्या लागतात.
ऊन, वारा, पाऊस इत्यादी बाह्य आणि कामक्रोधादी आंतरिक यातनांनी हा देह सतत ग्रस्त आहे.
संदेहवाही – संदेह धारण करील. म्हणजे असा हा देह आता टिकेल की नाही? याचा संदेह स्वतः त्या जीवाला आणि जमलेल्या सगळ्यांना वाटेल त्यावेळी.
यातनादेह हा शब्द शास्त्रात आणखी एका अर्थाने वापरतात. यमलोकांमध्ये किंवा स्वर्गामध्ये गेल्यानंतर केलेल्या पाप-पुण्याच्या फळांना भोगण्यासाठी जे देह प्राप्त होतात. त्यांना भोगदेह म्हणतात.
पापाचा विचार आधी येत असल्याने नरकातील देहाचा विचार केला. त्याला यातना देहच म्हणतात.
तो देह मिळण्याची संभावना तयार होईल अर्थात मृत्यूची वेळ येईल तेव्हा,
भवेदात्मदेहे न मोहो महान्मे – मला माझ्या या देहाच्या बाबतीत अत्यंत बळकट आसणारा मोह होऊ नये. अर्थात मी यामध्ये अडकू नये.
तदा – त्यावेळी,
काश – काश नावाचे पुष्प,
शीतांशु – ज्याची अंशु म्हणजे किरणे शीत आहेत असा, चंद्र.
संकाशम्- समान पांढरेशुभ्र असणारे,
ईश – हे भगवान शंकरा !
स्मरारे – हे कामदेव विनाशका,
वपुस्ते नमस्ते स्मराणि- हे भगवंता मी त्या आपल्या चंद्रधवल शरीराचे स्मरण करो. आपल्याला वंदन असो
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply