यदापारमच्छायमस्थानमद्भि-
र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् |
तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं
महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖
यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात.
किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात,
यदा – ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील,
अपारम् – प्रचंड लांब असणाऱ्या, त्यामुळे चालून-चालून कष्ट देणाऱ्या,
अच्छायम् – मार्गात सावली देणारे वृक्ष इत्यादी नसल्याने छाया विरहित. उन्हाच्या त्रासाने अधिकच क्लेशदायी होणाऱ्या,
अस्थानम् – मध्यंतरी विश्राम करण्यासाठी कोणतेच आराम स्थान नसलेल्या,
अद्भिर्जनैर्वा विहीनं – पाणी किंवा माणसांनी विहीन असणाऱ्या, अर्थात शारीरिक तृप्तता मिळावी यासाठी आवश्यक असणारे जल किंवा मानसिक शांती मिळावी यासाठी आवश्यक असणारे जन यापैकी कोणतेही साधन नसणाऱ्या,
गमिष्यामि मार्गम् – मार्गाने मी जेव्हा जाईल.
तदा – त्यावेळी
तं निरुंधं
कृतांतस्य मार्गं – त्या कृतांत म्हणजे यमराजाच्या मार्गाला बाजूला सारून,
महादेव – हे भगवान महादेवा !
मह्यं मनोज्ञं प्रयच्छ – मला मनोहारी असा, आपल्या परम वैभवशाली आणि आनंददायी कैलास लोकाचा मार्ग प्रदान करावा.
शास्त्रात एका बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे कोणतेही सुख साधन नसलेले, उलट सर्व दुःखदायक गोष्टी असणारे यम नगरीचे वर्णन आहे. तर दुसरीकडे सकल सौख्यदायक कैलासाचे वर्णन. आचार्य यमलोकाचा मार्ग सोडून त्या मार्गावर नेण्याची प्रार्थना करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply