यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् |
तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖
सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची कल्पना करीत म्हणत आहेत,
यदा – ज्यावेळी
रौरवादि – रौवर इत्यादी ८४ प्रकारच्या नरकांचे, शास्त्रात वर्णन केलेल्या तेथे प्राप्त होणाऱ्या भीषण अशा यातनांच्या
स्मरन्नेव – स्मरणानेच
भीत्या – घाबरून जाऊन,
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् – हे भगवान महादेवा मी येथे घोर अशा मोहामध्ये जाईल. अर्थात बेशुद्ध पडेल.
या वर्णनात अत्र म्हणजे येथेच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तिथे गेल्यावर तर भयानक यातना आहेतच पण येथे त्यांचे केवळ स्मरण देखील शेवटी जीवाचा थरकाप करते. त्यामुळे शेवटी तो बेशुद्ध पडतो.
सामान्यतः मृत्यूच्या पूर्वी जीव बेशुद्ध पडतो. अनेकांना थरकाप सुटतो. घाम फुटतो. मलमूत्र त्याग देखील होतो. त्याचे कारण हेच असते. आयुष्यभर केलेल्या पापांचे स्मरण होऊन आता त्यामुळे मला कशा नरकयातना होणार? या कल्पनेनेच तो जीव कासावीस होतो. त्याचे वर्णन करून आचार्य म्हणतात,
तदा – त्यावेळी
मामहो नाथ – हे माझ्या स्वामी मला, कस्तारयिष्यति – कोण तारणार? आपल्या शिवाय माझे आहे तरी कोण?
मी कसा आहे तर,
अनाथं – मला आपल्याशिवाय कोणीही नाही.
पराधीनम् – मी पूर्णतः पराधीन, हतबल आहे.
अर्धेंदुमौले – हे मस्तकावर चंद्रकोर धारण करणाऱ्या भगवंता, याप्रसंगी माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply