इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री-
त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि |
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा
नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖
या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही.
मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे.
त्यात आनंदाची गोष्ट एकच आहे की तो नेमका केव्हा येणार? हे आपल्याला निश्चित माहीत नाही. पण त्या आनंदाला एक वेगळी चिंतेची किनार आहे की तो कधी येणार हे माहिती नसल्याने, तो केव्हाही येऊ शकतो याची भीती जीवाला अखंड त्रास देते.
याच वास्तवाला आधार करीत आचार्य श्री म्हणतात,
इदानीमिदानीं – आत्ता अगदी आत्ताच,
मृतिर्मे भवित्रीति – माझा मृत्यू होऊ शकतो.
अहो संततं चिंतया पीडितोऽस्मि – या चिंतेने मी सतत पीडित आहे.
अर्थात कोणत्याही क्षणी माझा मृत्यू येऊ शकतो हा विचार सतत मनात येत असल्याने माझ्याजवळ असलेल्या, मी आज व अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या, सर्व सुख साधनांचे देखील पूर्ण सुख मला अनुभवता येत नाही.
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा – माझा मृत्यू कसा होणार नाही? याची भीती मला सतत असते. अर्थात तो होऊ नये असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तो टाळणे मला शक्य नाही हे समजत असल्याने भीती वाटते.
नमस्ते गतीनां गते नीलकंठ – हे भगवान नीलकंठा आपल्याला नमस्कार असो. अशा वेळी आपणच माझ्या गतीची गती अर्थात अंतिम अवस्था आहात.
येथे भगवंताला नीलकंठ हे विशेषण वापरणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या काळजीच्या पलीकडेची गोष्ट भगवान करतात ते म्हणजे विषप्राशन.
मात्र विष पिऊन देखील मृत्यूची भीती त्यांच्या हृदयात जागृत होत नाही. कारण ते विष त्यांनी कंठातच अडवले आहे.
विषप्राशन करून देखील अमर असणाऱ्या भगवंताला त्या मृत्यूचा भीतीपासून वाचवण्याची ही प्रार्थना आहे. तोच वाचवू शकतो कारण तो स्वतः वाचला आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply