यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं
स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते |
स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖
जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे.
प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात.
मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख आल्यावर आचार्य श्रींची ती मूळ वेदांतनिष्ठा जागृत झाली.
त्याआधारे परब्रह्म स्वरूपात भगवान शंकरांचे वर्णन करताना ते म्हणतात,
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं – ज्याच्या पासून हा विचित्र प्रपंच निर्माण होतो. अर्थात खरेतर ज्याच्या अधिष्ठानावर या चित्रविचित्र पदार्थ आणि घटनांनी भरलेल्या प्रपंचाचा भास होतो,
स्थितिं याति – ज्याच्या अधिष्ठानावर या संसाराचे कार्य चालते, यस्मिन्यदेकांतमंते – शेवटी तो सर्व प्रपंच त्याच्यातच लय पावतो,
स कर्मादिहीनः – अशा त्या कर्मविहीन, अर्थात या सगळ्याचे अधिष्ठान असले तरी स्वतः कोणतेच कर्म न करणारे,
स्वयंज्योतिरात्मा – आत्म ज्योती स्वरूप असणारे, जे भगवान श्री शंकर तेच माझे मूळ वास्तव स्वरूप आहे.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् – मी शिव आहे. मी शिव आहे. मी शिव आहे.
अर्थात या विश्वाची निर्मिती,स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे, खरेतर आधारभूत असणारे जे परम निर्गुण-निराकार स्वरूप तेच माझे मूळ रूप आहे. त्यात विलय पावणे, एकरूप होणे हे माझे ध्येय आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply