आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥
मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पश्चात्तापापासून वाचायचे असेल तर क्षमायाचना अत्यंत महत्त्वाची कृती ठरते.
प्रस्तुत स्तोत्रात गतजन्मीच्या अयोग्य कृतींपासून आचार्य आरंभ करीत आहेत. ते म्हणतात,
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां- पूर्वीच्या जन्मात केलेल्या कर्मांचा फळा नुसार त्यातील वाईट कर्मांनी मला मातेच्या गर्भात आणून टाकले. विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः –
तेथे रक्त, मांस,मलमूत्र या सगळ्या घाणीत मी पडलेलो होतो.
मातेच्या उदरातील जठराग्नी मला सतत जाळत होता.
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं- तेथे ज्या ज्या प्रकारची अत्यंत भयानक दुःखे आहेत त्यांचे पूर्णपणे कथन कोण करू शकेल?
या सगळ्यातून सुटण्याचा मला एकच मार्ग दिसत आहे. हे भगवान शंकरा मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपणास प्रार्थना करीत आहे ,
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – श्री महादेव शंभो माझ्या अपराधांना क्षमा करा. आपण परमपवित्र आहात आपल्या चरणाशी मला पवित्र करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply