वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥
बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति – म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
आधिदैवादितापैः – आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
पापै – आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
प्रौढिहीनं च दीनम् – माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं – ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो – हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply