हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे
स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो ।
भूतेश भीतभयसूदन मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥
भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते.
याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी या स्तोत्रात भगवान शंकरांच्या विविध नामांची गुंफण केली आहे. त्यांचे अर्थ पाहणे देखील तेव्हाचा अनुभव असेल. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
हे चन्द्रचूड – ज्यांनी आपल्या चुडा म्हणजे केशकलापावर चंद्रकोर धारण केली आहे असे,
मदनान्तक – ज्यांनी आपल्या तृतीय नेत्रातील अग्नीने मदनाला भस्म केले असे,
शूलपाणे- शूल म्हणजे टोक. तीन टोके असल्यामुळे भगवंताच्या आयुधाला त्रिशूल म्हणतात. पाणि म्हणजे हात. ज्यांनी हातात त्रिशूळ घेतला आहे असे, तीनही गुणांचे संचालक.
स्थाणो – परम स्थिर, अविचल,
गिरीश – गिरी म्हणजे पर्वत. त्या हिमालय पर्वतावर जे शयन करतात ते गिरीश.
गिरिजेश – त्या गिरी म्हणजे पर्वतापासून जन्माला आली ती गिरीजा. अर्था देवी पार्वती. तिचे स्वामी.
महेश – सगळ्यात श्रेष्ठ देवता,
शंभो – सगळ्यांचे कल्याण करणारे,
भूतेश – सर्व प्राणिमात्रांचे स्वामी, नियंत्रक, संचालक.
भीतभयसूदन – भीत म्हणजे घाबरलेला . त्याच्या भीती चे कारण ते भय. त्या भयाला जे दूर करतात ते भीतभयसूदन.
मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – हे जगदीशा ! माझ्यासारख्या अनाथांचे या संसाराच्या गहन दुःखातून रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
श्री शांकर स्तोत्ररसावली
Leave a Reply