ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला ज्येष्ठ इतिहास संशोधक दाऊद दळवी यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
ठाण्यातील सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला अव्वल इंग्रजी आमदनीपासून सुरुवात झाली. इंग्रजी भाषा व पाश्चात्त्य शिक्षण यामुळे त्या काळातील तरुण सुशिक्षित वर्गात वैचारिक क्रांती आली. अंधश्रद्धा, अप्रस्तुत चालीरीती, सती, बालविवाह, विधवा विवाह, विधवांचे ज्वलंत प्रश्न, सामाजिक असमतोल अशा अनेक समस्या सुशिक्षितांचे लक्ष वेधून घेऊ लागल्या. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी देशमुख, दादोबा पांडुरंग तर्खडकर, भाऊ महाजन इत्यादींनी सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ, ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचा ब्राह्मणेतर समाजाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न व न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले व लोकमान्य टिळक यांनी समाज सुधारणेचा व राजकीय विचारांचा निर्माण केलेला जोमदार प्रवाह या सर्वांचा परिणाम ठाणेकरांवरही झाला. लोकमान्यांच्या जहाल व बाणेदार लेखणीने ठाणेकर भारावून गेले. त्याची थेट परिणती धोंडोपंत फडक्यांनी ‘अरुणोदय’ व ‘ठाणे हिंदुपंच’ ही वृत्तपत्रे प्रकाशित करण्यात झाली.
ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक साहित्यिक, लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, नाट्यकर्मी, दिग्दर्शक व सगीतकारांचे वास्तव्य. त्यामुळे नगराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचावण्यास मदत झाली. ही सुरुवात १९व्या शतकाच्या पूर्वार्धात दिसून येते. जुन्या जमान्यातील कवी भास्कर दामोदर पाळंदे हे ठाण्यात राहत असत. ब्रिटिशांच्या काळात ते न्यायाधीश होते. त्यांनी ‘विक्रमोर्वशीयम्’ या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबद्ध भाषांतर केले. त्यांनी ‘रत्नमाला’ हा भक्तिपर पद्यग्रंथ लिहिला. १८८२ मध्ये ठाण्याच्या प्रसिद्ध बी.जे. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून जनार्दन बाळाजी मोडक यांची नेमणूक झाली. अतिशय विद्वान व लोकप्रिय शिक्षक तसेच संस्कृतचे गाढे पंडित म्हणून त्यांना मान्यता होती. ठाण्याच्या इतिहासावरील पहिलेवहिले पुस्तक त्यांनी लिहिले. काही काळ ‘काव्येतिहास संग्रह’ या मासिकाशी त्यांचा संबंध होता. ठाण्याला शंकर बाळकृष्ण दीक्षित यांची मराठी शाळा नं. १ वर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांची व जनार्दन बाळाजी मोडक यांची याच काळात घनिष्ठ मैत्री झाली. उभयतांना ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासात विलक्षण रस होता. त्याकाळातील ज्योतिर्विशारद विसाजी कृष्णलेले यांच्या सायनेवादावरील लेखनाने ते अत्यंत प्रभावित झाले. या तिघांनी मिळून मराठीतील पंचांगावर पहिले पंचांग ‘सायनपंचांग’ प्रसिद्ध केले. त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या प्रचंड अभ्यासामुळे पाश्चात्त्य इतिहासकार फ्लांट व डॉ. रॉबर्ट सेबेल यांना प्राचीन भारताची कालगणना करणे सोपे गेले. डॉ. फ्लांट यांचा प्रसिद्ध शोधग्रंथ ‘गुप्त इन्स्क्रिप्शन्स’ यात दीक्षितांबद्दल आदर व्यक्त केला आहे. डॉ. सेबेल यांनी भारतीय कालगणनेवरील ‘इंडियन कॅलेंडर’ या पुस्तकातही दीक्षितांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. दीक्षित अतिशय व्यासंगी विद्वान होते. त्यांनी, ‘विद्यार्थीबुद्धिवर्धिनी’, ‘सृष्ट चमत्कार’, ‘सोपपत्तिक अंकगणित’, ‘धर्ममीमांसा व ज्योर्तिविलास’, ही विज्ञानावर अधिष्ठित पुस्तके लिहिली. भारतीय ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्राच्या इतिहास व विकासावर लिहिलेला ग्रंथ तत्कालीन विद्वानांमध्ये मान्यता पावला होता. ज्योतिषाची मूलतत्त्वे ग्रीसमधून भारतात आली व टॉलेमीपासून हिंदूंना ज्योतिषशास्त्र मिळाले ही विधाने त्यांनी सप्रमाण खोडून काढली. दीक्षितांच्या काळातच रावबहादूर सखाराम केशव भागवत, गणेश नारायण खरे, कोल्हापूरचे माजी दिवाण रघुनाथ व्यंकाजी सबनीस यांच्यासारखे दिग्गज विद्वान ठाण्यात राहत होते, हे ठाणेकरांचे भाग्य होय.
सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे यांचे नाव महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र सारस्वत’ व स्थापन केलेले ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ या त्यांच्या दोन अमूल्य देणग्या आहेत. भावेंनी इतिहास संशोधनाची नवी दालने उघडून दिली. त्यांनी चक्रवर्ती नेपोलियनचे चरित्र अत्यंत ओघवत्या व उठावदार शैलीत लिहिलेले आहे. साहित्य व इतिहासाव्यतिरिक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, कीटक व वनस्पती यांवरसुद्धा अतिशय उपयुक्त टिपण वजा माहिती त्यांनी लिहिलेली आहे. जनकवी पी. सावळाराम हे जनतेचे लाडके दादा म्हणून ते सर्वाना परिचित होते, विनम्रता व नर्मविनोदी स्वभावामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उभारून येई. दादांनी अजरामर गीते लिहिली. आजही त्यांची गीते आपण गुणगुणतो. या गीतांतून त्यांनी मराठी माणसाच्या साध्याभोळ्या जाणिवांची, तरुण तरुणींच्या शुद्ध प्रेमाची, विठोबा रखमाईपासून कृष्ण माधवाच्या अध्यात्माची नोंद घेतली. साध्या शब्दांतून मानवी जीवनाची अत्यंत हृदयस्पर्शी उकल त्यांच्या गीतांतून होते. दादांनी लिहिलेले प्रत्येक गीत मग ते भक्तिगीत असो वा भावगीत असो, गौळण किंवा लावणी असो किंवा चित्रपटातील गीत असो; ते बावनकशी व प्रत्यक्ष अनुभूतीतून निर्माण झालेले आहे. संगीत चूडामणी पं. राम मराठे यांचे होय, अभिजात गायक, रंगभूमी, नाट्यसंगीतातील मर्मज्ञ व शास्त्रीय गायकीचे प्रणेते म्हणून ते ठाणेकरांना पारिचित आहेत. विष्णुपंत पागनीस व मास्टर कृष्णराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय गायकीचे शिक्षण घेतले. त्याकाळातील प्रसिद्ध अशा आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर इत्यादी घराण्यांची गायनशैली त्यांनी आत्मसात केली व गायकीत स्वतःचे प्रयोग करून ती संपन्न केली. बंदिश, जलद गतीतील तान, बोलतान व लयकारी ही त्यांची खासियत होती.
या व्यतिरिक्त ठाण्यातील आणखी दोन व्यक्तिमत्त्वांची नोंद घेणे आवश्यक ठरते. ती म्हणजे गेल्या शतकातील प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार विठ्ठल सायन्ना व ठाण्याला जगाच्या नकाशात मानाचे स्थान देणारे लोकप्रिय क्रिकेटपटू खंडेराव रांगणेकर हे होत. ठाणे व मुंबईच्या वास्तू जडणघडणीत विठ्ठल सायन्ना व त्यांचे सुपुत्र नारायण विठ्ठल सायन्ना यांनी अतिशय मोलाची भर घातली. मुंबईतील अनेक भव्य इमारती त्यांनी बांधल्या. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय), स्मॉल कॉजेस कोर्ट व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या इमारती बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस (व्ही.टी.) वा हल्लीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अतिभव्य स्टेशनाचा काही भाग विठ्ठल सायन्ना यांनी बांधलेला आहे. आपल्या वडिलांची स्मृती म्हणून ठाण्याचे सरकारी सिव्हिल हास्पिटल बांधून गरीब व गरजू रुग्णांसाठी कायमस्वरूपी सोय त्यांनी केली.
खंडेराव मोरेश्वर रांगणेकर हे ठाण्यातील अतिशय लोकप्रिय व धडाडीचे क्रिकेटपटू होते. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमुळे त्यांनी ठाण्याचे नाव जगभर केले. त्यांनी तडाखेबाज क्रिकेटची सुरुवात १९३९ पासून मुंबईत पंचरंगी सामन्यात खेळून केली. १९४७-४८ या काळात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा तीन कसोटी सामन्यात ते खेळले. उत्कृष्ट फलंदाज व कव्हर पॉईंटचे चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ते प्रसिद्ध होते. क्रिकेटबरोबर बॅडमिंटन ते खेळालाही त्यांनी सारखेच महत्त्व दिले. क्रिकेटमधील त्यांच्या झंझावती खेळामुळे त्या काळातील मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यारखान त्यांना आदराने ‘क्रिकेटचा बाजीराव’ असे म्हणत. १९६० साली ठाणे नगरपालिकेचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.
ठाण्यातील सामाजिक प्रबोधनाची सुरुवात चरखा मेळा, बजरंग मेळा, मावळी मेळा, आनंद भारती मेळा इत्यादी मेळ्यांतून झाली. मेळ्यांच्या माध्यमातून सांघिक व शहर पातळीवर पहिल्या प्रथमच ठाणेकरांना एकत्र येण्याची संधी मिळाली. सामाजिक प्रबोधनाबरोबर राष्ट्रीय जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. मनोरंजन व व्यायाम ही मर्यादित उद्दिष्टे असलेल्या मेळ्यांमधून हळूहळू समाजोपयोगी, शैक्षणिक व विशिष्ट ध्येये असलेल्या संस्था नवे प्रगल्भ रूप घेऊ लागल्या. त्यांच्या उद्दिष्टांत व कार्यक्रमांत लक्षणीय बदल घडून येऊ लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात श्री आनंद भारती समाज, श्री समर्थ सेवक मंडळ, श्री मावळी मंडळ, आर्य क्रीडा मंडळ, हितवर्धिनी सभा, ब्राह्मण सेवा संघ व इतर लहान मोठ्या संस्थांनी ठाण्याच्या सामाजिक व शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीत मोलाची भर घातली आहे.
या शिवाय क्रीडा, व्यायाम व योग क्षेत्राला वाहून घेतलेल्या ठाणे फ्रेंडस युनियन क्रिकेट क्लब (१९१५) कायस्थ प्रभु सोशल क्लब (१८९१), ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ (१९६१), श्री अंबिका योग कुटीर (१९६५) या महत्त्वाच्या संस्था आहेत. अलीकडच्या काळातील घंटाळी मित्र मंडळ (१९६५), ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटना (१९६३), ठाणे जिल्हा बास्केट बॉल संघटना (१९७३), ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (१९८७), युनायटेड स्पोर्टस् क्लब (१९४०), सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट (१९२६), या संस्थांचे क्रीडाक्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खंडेराव रांगणेकर, अर्जुन पुरस्कार व छत्रपती अवॉर्ड मिळवणारी जलतरणपटू आरती प्रधान, बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड, क्रिकेट सांख्यिकीतज्ज्ञ सुधीर वैद्य, क्रिकेटपटू तुकाराम सुर्वे, मधुकर हळदणकर, रमेश खारकर व कृष्णाजी जाधव वस्ताद या सर्वांनी, विविध खेळांतील नैपुण्यामुळे ठाणे शहराला भारताच्या खेळ नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे. दिल्ली येथे नुकत्याच भरलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ठाण्याच्या ममता प्रभू (देना बँक) व मधुरिका पाटकर यांनी टेबल टेनिसमधील रौप्य पदके पटकावली. त्यांचा हा विक्रम ठाणेकरांना ललामभूत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः ठाणे नगरपालिकेचे ठाणे महानगरपालिकेत (१९६१) रूपांतर झाल्यानंतर शहरात एक अभूतपूर्व सांस्कृतिक व सामाजिक आवर्तन आले. ठाणे शहराच्या सांस्कृतिक विकासात श्री कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्ट, तत्त्वज्ञान विद्यापीठ, प्राच्यविद्या अभ्यास केंद्र, मराठी विज्ञान परिषद, इन्स्टिट्यूट फॉर सायकालॉजिकल हेल्थ, हरियाली, रोटरी क्लब पुरस्कृत होप, भारतीय महिला फेडरेशन ठाणे समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, कोकण इतिहास परिषद, सहजीवन फाउंडेशन, नटराज नृत्य निकेतन, श्रीगणेश नृत्यकला मंदिर, नालंदा भरतनाट्य नृत्य निकेतन, आनंद भारती, कलायतन, नाट्यमन्वंतर, कलासरगम, नाट्यनिनाद, रंगवैभव, नाट्यसंधी, इंद्रधनु, ठाणे स्कूल ऑफआर्ट, समर्थ भारत व्यासपीठ, विविध रोटरी क्लब्स, लायन्स क्लब इत्यादी संस्थांचा फार मोठा सहभाग आहे. पुणे, नागपूर व कोल्हापूरच्या बरोबरीने साहित्य कला व नाट्यक्षेत्रात ठाण्यानेआघाडी घेतली आहे. किंबहुना ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उप राजधानी म्हणणे जास्त समर्पक ठरेल.
ठाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत दोन संस्थांचा फार मोठा सहभाग आहे. त्या म्हणजे ठाणे नगरवाचन मंदिर (म्युलक लायबरी) व मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे. दोन्ही शतकोत्तर ग्रंथालये आहेत. ब्रिटिशांनी आपल्यासोबत वृत्तपत्रे व सार्वजनिक ग्रंथालये या दोन महत्त्वाच्या संकल्पना हिंदुस्थानात आणल्या. १८५० च्या सुमारास ठाण्यातील एक इंग्लिश न्यायाधीश श्री. केस यांच्या पुढाकाराने ‘ठाणा नेटिव जनरल लायबरी’ स्थापन झाली. जिल्ह्यातील हे पहिलेच ग्रंथालय होते. १८७९-८० या काळात ठाण्याला डब्ल्यू. बी. म्युलक हे इंग्रज जिल्हाधिकारी लाभले. त्यांच्या प्रेरणेने नटिव्ह जनरल लायबरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. सन १८८२ मध्ये टेंभी नाक्यावर ग्रंथालयासाठी अत्यंत सुरेख व टुमदार इमारत बांधण्यात आली. लोकांच्या आग्रहापोटी जनरल नेटिव्ह लायब्ररीचे नामकरण ‘म्युलक लायबरी’ असे करण्यात आले, १ जानेवारी १९६५ मध्ये या ग्रंथालयाचे म्युलक लायब्ररी हे नाव बदलून त्याऐवजी ‘ठाणे नगर वाचन मंदिर’ असे ठेवण्यात आले. ग्रंथालयाने गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले. मराठीतील नामवंत साहित्यिकांनी व विचारवंतांनी ग्रंथालयास भेट देऊन ग्रंथालयाची प्रशंसा केली आहे. ११ एप्रिल २००० मध्ये ग्रंथालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
म्युलक लायब्ररी प्रामुख्याने इंग्रजी वाचकांसाठी होती. तिथे मराठी पुस्तकांचा संग्रह त्यामानाने खूपच कमी होता. ठाण्यातील बहुसंख्य वाचकांच्या दृष्टीने ती फार मोठी उणीव होती, ती भरून काढावी असे नवसुशिक्षितांना वाटत असे. त्यापैकी काही होतकरू तरुणांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले. या तरुणांचे नेतृत्व सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे व विष्णु भास्कर पटवर्धन यांनी केले. १जून १८९३ मध्ये मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. ठाण्यात संग्रहालयाच्या रूपात ज्ञानगंगा अवतरल्यामुळे एक मोठे स्वप्न साकार झाले. शतकोत्तर वाटचाल करीत असलेले हे ग्रंथालय ठाण्याचा मानबिंदू आहे. ग्रंथालयातील पुस्तकांच्या विषयातील वैविध्य थक्क करणारे आहे. शिलाप्रेसवर छापलेली व खिळ्यांच्या छपाईवरची अतिशय दुर्मिळ अशी सुमारे १९१५ पुस्तके येथे आहेत. शंभर वर्षांच्या कालावधीत संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले. त्यात विद्वानांची व्याख्याने, परिसंवाद, साहित्यिक मेळावे, संमेलने व ग्रंथप्रदर्शने इत्यादींचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळकांचे मार्गदर्शन ग्रंथसंग्रहालयाला लाभले, हे ठाणेकरांचे फार मोठे भाग्यच म्हटले पाहिजे, १९६० मध्ये ग्रंथसंग्रहालयाने ४२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीरीत्या भरवले होते. तसेच १९८८ साली ६१ वे साहित्य संमेलन आणि आता २०१० मध्ये ८४वे साहित्य संमेलन याच संस्थेच्या माध्यमातून होत आहे. ठाणे नगर वाचन मंदिर व मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांना स्वतःच्या प्रशस्त इमारती आहेत. त्यांच्या माध्यमांतून भविष्यात ठाण्यातील अनेक पिढ्यांना ज्ञानलाभ घेता येईल, यात शंका नाही भिवंडी व कल्याण सार्वजनिक वाचनालय ही जिल्ह्यातील आणखी दोन शतकोत्तर ग्रंथालये आहेत.
ठाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत ठाणे महानगरपालिकेचा फार मोठा सहभाग आहे. १९८३ साली महापालिकेच्या विधिवत कारभाराची सुरुवात झाली. आ. सतीश प्रधान महापालिकेचे प्रथम अध्यक्ष महापौर झाले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सांस्कृतिक उपक्रमांची व त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. महापालिका निर्माण झाल्यानंतर ठाणे शहराने कात टाकली. झपाट्याने होणारे औद्योगिकरण व नागरीकरण यामुळे शहराची लोकसंख्या बेसुमार वाढली. त्यातच परप्रांतीयांच्या लोंढ्याने ठाण्यातील मराठमोळ्या जीवनावर अनिष्ट परिणाम होऊ लागला. अशा परिस्थितीतही दोष व त्रुटी असूनही पालिकेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. पालिकेने केवळ नागरी सुविधा, रस्ते बांधणी, दिवाबत्ती, परिवहन, आरोग्य, नगर स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, प्राथमिक शिक्षण या सुविधांचाच पाठपुरावा न करता; शहराचा मानसिक व सांस्कृतिक विकास करणे व सामाजिक तसेच क्रीडा विषयक परंपरा जोपासणे यांवरही भर दिला आहे. त्यामुळे पालिका ही औपचारिक नागरी सोईसुविधा पुरवणारी संस्था राहिली नसून, व्यक्तिमत्त्व विकास, संस्कृती व कलासंवर्धन तसेच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय लोककल्याणकारी महापालिका झाली आहे. पालिकेने लोकसहभागातून अतिशय महत्त्वाकांक्षी व शहराचा सांस्कृतिक दर्जा वाढवणाऱ्या योजनांचा स्वीकार केला आहे. या योजना ठाण्यातील विविध प्रभागांच्या गरजा व सोई पाहून ठरवण्यात आल्या आहेत. कला व नाट्यक्षेत्राला प्रोत्साहन देणारे गडकरी रंगायतन ठाण्याच्या दक्षिण भागात आहे. नव्याने विकसित झालेल्या भागातील जनतेला ते फारच लांब पडते. या उद्देशाने मानपाडा भागात १२०० आसनांचे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तसेच हजुरी भागात ठाणे आर्ट सेंटर, माजिवड्यातील कला दालनासारखी भव्य इमारत बांधली आहे. या इमारतीत ग्रंथालय, वाचनालय व सभागृहाची सोय असणार आहे. नागरिकांमध्ये विज्ञान व खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी म्हणून व्होल्टास कंपनीच्या सुविधा भूखंडावर अद्ययावत तारांगण उभारण्यात येत आहे. विज्ञान, विशेषतः वनस्पती व वृक्षवल्ली यांच्या संवर्धन व अभ्यासासाठी मानपाडा येथील मुल्ला बागेजवळ १७ एकर जागेवर, विज्ञान पार्कची संकल्पना राबवण्यात येणार आहे. खेळ व क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी कौसा येथे १० हेक्टर जागेत प्रादेशिक क्रीडा संकुल व प्रबोधिनीचे प्रयोजन करण्यात आले आहे. कोरस वर्तकनगर येथे मध्यवर्ती संग्रहालय, वाचनालय व सभागृह ‘ अशी उभारण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईच्या धर्तीवर मत्स्यालय बांधण्याची पालिकेची योजना आहे. सौरऊर्जेचा वापर करून ठाण्यातील रस्त्यावर दिवाबत्ती, तलावांचे व उद्यानांचे सुशोभीकरण, सार्वजनिक रुग्णालये यांना विद्युत पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही पालिकेने हाती घेतली आहे. याशिवाय पर्यावरण व तलावांचे संवर्धन, खारफुटीची लागवड, घनकचरा विल्हेवाट, उद्याने व चौकांची निर्मिती हे सर्व उपक्रम; ठाणे महानगरपालिकेच्या प्रगल्भ मानसिकतेचे द्योतक आहे. पण त्यासाठी सामाजिक जाणीव, निःस्पृहता, प्रामाणिकपणा व प्रत्येक उपक्रमात पूर्णपणे झोकून देण्याची क्षमता, सुजाण नागरिक, नगरसेवक व नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला असणे आवश्यक आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक विकासात तीन उपक्रमांची नोंद घेतली पाहिजे. कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्ट तर्फे गुढी पाडव्याला निघणारी नववर्षादिनाची शोभायात्रा ठाण्याचे भूषण ठरली आहे. ठाण्यातील सर्व सांस्कृतिक, सामाजिक व विविध धर्मप्रणालींच्या संस्थांचा शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग असतो. भारतीय राष्ट्रीयत्वाची जपणूक करणे, संस्कारक्षम विचारांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रवृत्तीला व समजप्रबोधनाला पोषक होतील अशा देखाव्यांची निर्मिती करणे; ही उद्दिष्ट्ये शोभायात्रेत असतात. पाश्चात्त्य संस्कृतीतील अनिष्ट प्रवृत्तीच्या प्रभावाला शोभायात्रा हे बोलके प्रत्युत्तर आहे. हजारोंच्या संख्येने ठाणेकर नागरिक पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सामील होत असल्यामुळे एक नव-चैतन्यमय वातावरण निर्माण होते.
ठाण्यातील दुसरे सर्वात मोठे सांस्कृतिक व धार्मिक आकर्षण म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर सुरू केलेला नवरात्री महोत्सव होय. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत श्रीभवानी देवीच्या उत्सवास समस्त ठाणे शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक नागरिकांचा त्यात प्रचंड प्रमाणात सहभाग असतो.
श्री. सतीश प्रधान महापौर असताना त्यांनी वर्षा मॅरॅथॉन स्पर्धेचा उपक्रम सुरू केला. क्रीडाक्षेत्रातील हा सर्वात मोठा उपक्रम आहे. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सहभाग असलेली ही दौड ठाण्याचे आकर्षण आहे. उपरोल्लेखित तिन्ही उपक्रमांतून ठाण्यातील जनतेला सार्वजनिक सोहळ्यात सहभाग होण्याचा आनंद मिळतो. किंबहुना हे उपक्रम ठाण्यासाठी सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करण्याचे मोठे साधन आहे.
— दाऊद दळवी
Leave a Reply