नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ नामाचे महत्व !

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत ॥

॥ स्वामी वैभव दर्शन भाग -02 ॥

॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥

स्वामी भक्तांनो…..

अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात. स्वामींना  आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा, खडतर साधना करण्यापेक्षा, आपले कर्म करत करत केलेले अल्प नामस्मरण ही पुरेसे पडते. स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया, वाचा, मनाने केलेली तोडकी मोडकी सेवा ही ते अगदी सहजतेने स्विकारतात आणि याच अल्पशा सेवेचे फळ ते एखाद्या महान योग्याच्या साधनेलाही लाजवेल एवढे मोठे देतात. एवढे भक्तवत्सल स्वामी महाराज आहेत. स्वामी अक्कलकोटी असताना हिमालयापासून ते काशीपर्यंतचे हजारो साधू, तपस्वी, ऋषी, साधक हे रोजच अक्कलकोटी केवळ समर्थांच्या दर्शनासाठी येत. यातील अंसख्य जन हे अक्कलकोट वासियांचे कौतूक करताना म्हणत की, ‘हजारो वर्ष जप, तप इत्यादी खडतर साधना करून ही ज्या परब्रह्माचे एक वेळ, एक घटिका ही दर्शन होत नाही. तो पुर्ण परब्रह्म या अक्कलकोटी रात्रंदिवस राहतो. हे तुमच्या कोणत्या साधनेचे फळ आहे. हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही. एवढे तुम्ही भाग्यवान आहात.’

सज्जनहो, सांगण्याचा उद्देश्य एवढाच की, शेकडो, हजारो वर्ष साधना करणाऱ्या तपस्वांना ही स्वामी दर्शनाशिवाय सद्गती मिळत नाही. ते स्वामी चरण आपल्याला अगदी सहज प्राप्त झाले आहेत, तेव्हा आता तरी आपण या सुवर्णं संधीचा लाभ घेऊ या. अहो, ज्या स्वामींचा दरवर्षी येणारा प्रकट दिन हा 11 वेळा येणाऱ्या कपिलाषष्ठीच्या योगांपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. त्या स्वामींचे नामस्मरण आणि चिंतन याच्या पुण्याची गणना कोण करील ? एवढे आनंदनिधान आम्हाला लाभले आहे. अन् आम्ही मात्र ईतर निरर्थंक गोष्टींच्या मागे धावत आहोत. हा आमचा कपाळकरंटेपणा म्हणायचा की कर्मदारिद्रपणा हेच कळतं नाही.

याचाच विचार करुन वाट चुकलेल्या स्वामी भक्तांना परत एकदा योग्य वाटेवर आणण्यासाठी स्वामीसुत महाराजांनी स्वामींच्या श्रेष्ठतेचे सहज आणि सर्वांगसुदंर असे वर्णन पुढिल अभंगाद्वारे केले आहे.

किती गोड प्रेम, किती गोड धाम ।  किती गोड नाम समर्थांचे ॥1॥

किती गोड लीला, किती गोड कळा।  तुम्हीं घ्या सोहळा स्वामीनामीं ॥2॥

एक चित्तीं ठेवा, एक चित्तीं ठेवा ।  स्वामीराज ध्यावा अनुदिन ॥3॥

स्वामीसुत म्हणे मुंबापुरीजन । स्वामी हा निधान चित्तीं ठेवा ॥4॥

आपल्या केवळ चार चरणांच्या अभंगातून स्वामीसुतांनी स्वामी महाराजांचे अत्यंत दिव्य असे वर्णन केले आहे. स्वामीसुत म्हणतात, स्वामींचे प्रेम, वात्सल्य, ममता किती गोड आहे ! किती अवर्णनिय आहे. याची कोणीही गणना करू शकत नाही. कोसोदुर असलेल्या लक्ष्मण कोळ्याचे जहाज पाण्यावर काढणारे स्वामी, मृत उंदिर जिवंत करणारे स्वामी, पिसाळलेली सुंदरी वानरी प्रेमळ करणारे स्वामी, आपल्या ईच्छेप्रमाणे भक्तांना राम, कृष्ण, विठ्ठल स्वरुपात दर्शन देणारे स्वामी, वेड्या मन्याबाला सिध्द योगी बनविणारे स्वामी, आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पुर्ण करणारे स्वामी, स्वत: परब्रह्म आणि ब्रह्मांडनायक असूनही सुंदराबाईची प्रत्येक आज्ञा निमूटपणे पाळणारे स्वामी, अशी किती किती म्हणून उदाहरणे द्यावीत, स्वामींच्या प्रेमळतेची, वात्सल्यतेची, अथांग ममतेची. असा प्रश्न पडतो, असे स्वामीसुतांना वाटते. जे स्वामी स्वत:च एवढे अथांग प्रेम सागर आहेत, तेव्हा त्यांचे निवासस्थान असलेले अक्कलकोट धाम हे किती गोड असेल, किती सर्वश्रेष्ठ असेल ! याचे महत्व बुध्दीची देवता गणपतीला ही सांगता येणार नाही. दु:खित, पिडीत, मुमुक्षू, रंजलेले, गांजलेले, दारीद्री, महारोगी अशा कितीतरी प्रकारच्या लोकांचा उध्दार या अक्कलकोटी झाला आहे. एवढे श्रेष्ठतम असे महाशक्तीपीठ अक्कलकोट आहे. याच अक्कलकोटचे महत्व स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी पुढिल प्रमाणे वर्णन केले आहे.

अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड। कल्पनेचा मोड नाही तेथे।।1।।

शुद्ध प्रेमभाव पादुका दर्शन। कुशावर्ती स्नान बारा वेळ।।2।।

प्रदक्षिणा केल्या पाप सरुनी जाय। पवित्र तो होय देह तेथे।।3।।

शुद्ध अनुष्ठान जणू तेची ध्यान। आवड ही पूर्ण स्वामीपायी।।4।।

आनंद म्हणे तया होईल दृष्टांत। दैवगती भेट कलियुगी।।5।।

असे भूवैकुंठ अक्कलकोट धाम आहे. त्याची गोडी किती किती वर्णावी असा प्रश्न स्वामीसुतांना पडला आहे. जो परब्रह्म स्वत: एवढा प्रेमळ आहे, त्यांच्या निवासाने अक्कलकोट हे सर्वश्रेष्ठ धाम बनले आहे. त्या समर्थांचे नाम किती गोड असेल, याची कल्पनाही करवत नाही ! किंवा प्रत्यक्ष सरस्वती मातेला ही या नामाची थोरवी वर्णिता येणार नाही, असे स्वामीसुतांना वाटते. स्वामींच्या वास्तव्य काळापासून ते आजगायत कोट्यावधी भक्त हे केवळ नामस्मरणानेच तरले आहेत. अजूनही तरत आहेत. हे भक्त्‍ स्वामींच्या नामचिंतनाशिवाय ईतर कोणतीही साधना करत नाहीत तरीही त्यांचा उध्दार होतो. हेच स्वामी नामाचे श्रेष्ठत्व आहे. स्वत: स्वामीसुत महाराज, आनंदनाथ महाराज, बाळाप्पा महाराज, चोळाप्पा महाराज, बीडकर महाराज, ब्रह्मनिष्ठ वामनबुवा, गोपाळबुवा केळकर, धनकवडीचे शंकर महाराज, नाशिकचे पिठले महाराज अशा अनेक अंतरंगीच्या स्वामी भक्तांनी ही स्वामी नामचिंतनाशिवाय ईतर कोणतीही साधना केल्याचे ऐकिवात नाही. तरी सुध्दा हे सर्वजण अजरामर ठरले. कारण एकच केवळ स्वामी नाम स्मरण. एवढे अगाध आणि अथांग स्वामी नाम आहे.

प्रेम, धाम आणि नाम गोड असणाऱ्या स्वामींच्या लीला ही तेवढ्याच गोड आहेत. मानवी बुध्दिला अगम्य असणाऱ्या लीला हा परब्रह्म अगदी सहज करतो. याच्या लीलापुढे लीलाधर विष्णूसुध्दा तोकडा पडतो. एवढ्या गोड लीला स्वामींच्या आहेत. ज्यात चीनी दामत्यांचे स्त्री-पुरुष स्वरूप बदलणे, अंबाजोगाईला मुलीचा मुलगा करणे, लघूशंकेने कोरड्या विहरीत पाणी निर्माण करणे, सापाचे, हाडाचे सोने करणे, एकाचे मरण दुसऱ्यावर घालवणे, मुक्याला वाचा देणे, मृत रावण्णाला जीवंत करणे, विपरीत उपायाने रोग बरे करणे, डोक्यावर हात ठेवून ब्रह्मज्ञान प्राप्त करुन देणे अशा अनेक असाध्य वाटणाऱ्या लीला या लीलाधर स्वामींनी अगदी सहजतेने केल्या आहेत. ज्या कितीही सांगितल्या तरीही कमीच आहेत. असे स्वामीसुतांना वाटते. जेवढ्या स्वामींच्या लीला गोड आहेत, त्याहून हि स्वामींच्या कळा गोड आहेत. कळा म्हणजे स्वामींचा स्वभाव वा आचरण होय. स्वामींचे आचरण एवढे विचित्र होते की, वरवर पाहणारा स्वामींना ढोंगी किंवा वेडा मनुष्य ठरवून मोकळा होई. कारण स्वामींचे लहान मुलासारखे हट्ट करणे, लहान मुलांचे खेळ खेळणे, कुठेही लघूशंका, शौच करणे, मनात आले की कधीही सर्व वस्त्रांचा त्याग करून दिंगबर होणे, कधी कधी पलंग गदागदा हालेपर्यंत मोठ्याने हास्य करणे, कधी राग अनावर करणे, भविष्यात घडणाऱ्या घटना चित्र विचित्र खुणा, हातवारे करून सांगणे. अशा अनेक गोष्टी स्वामींच्या स्वभावातील विशेष गुण होत. ज्याद्वारे अनुमान काढले असता स्वामी परब्रह्म तर दुरच मात्र सत्पुरूष ही भासू नये. अशी विचित्र अवस्था असे. जिज्ञासू भक्तांना यातून योग्य तो बोध लगेच होई. पण हा स्वभाव ही शुध्द फसवणूक होती. जे केवळ अहंकारी व पढत मुर्ख आहेत, त्यांची परिक्षा घेण्यासाठी हे एक पांघरूण होते.

तेव्हा या वरवरच्या स्वरुपाकडे न पाहता आपण स्वामींची अंतरंगातून ओळख पटवून घ्यावी व स्वामींच्या सत्य स्वरूपाला जाणून घेऊन स्वामींच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जावे. स्वामींचा नामजप सोहळा अखंड चालवावा, अशी विनंती स्वामीसुत करताना दिसतात. आपल्या चित्तात केवळ आणि केवळ फक्त स्वामींचेच ध्यान करावे, दिनरात फक्त स्वामीनांच आळवावे. सदैव केवळ स्वामींचाच धावा करावा. कारण हे स्वामीनामच आपल्याला तारणार आहे. आपल्या सर्व संसारीक आणि पारमार्थिक अडी अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वामीनाम हेच सर्वोत्तम औषध आहे. असे स्वामीसुत आवर्जुन सांगताना दिसतात.

शेवटी स्वामीसुत सांगतात, हे मुंबापुरीजन (स्वामीसुत हे मुंबईत असल्यामुळे त्यांनी मुंबापुरी असा शब्द प्रयोग भौगोलिक दृष्ट्या केला असला तरी मुंबईचेच दुसरे नाव मायानगरी आहे. त्याअर्थांने मायेच्या प्रभावाखाली असणारे लोक म्हणजेच मुंबापुरीजन या अर्थाने हे सर्वांनाच लागू पडते) हो, आपल्या मनातील ईतर सर्व शंका कुशंका बाहेर काढा, आपल्यातील ईतर सर्व द्वंद बाहेर काढा, आपल्यातील षडविकार, वासना, मोह, लालसा यांचा त्याग करा. आपले मन, चित्त हे निर्मळ करून त्या निर्मल चित्तात हे स्वामी निधान ठेवा. या स्वामी निधानाची स्थापना आपल्या शुध्द आणि निर्मल मनात करा. केवळ असे केल्यानेच तुम्ही या मायेच्या प्रभावापासून मुक्त व्हाल. अन्यथा या मायेच्या प्रभावाने एक दिवस तुमचा घात निश्चित आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. लक्ष 84 योनिचे चक्र फिरून हा दुर्लभ नर देह लाभला आहे. एकदा का हि संधी गेली की, मग पुन्हा लक्ष 84 योनीचे चक्र सुरू होईल. तेव्हा हाताशी आलेली संधी न गमावता, माझ्या स्वामींना शरण जा. माझ्या स्वामींचे ध्यान करा. माझ्या स्वामींचे चिंतन करा. तरच तुमची या मायेपासून सुटका होईल. कारण माझा स्वामी हा मायाधिपती आहे, सर्वेश्वर आहे. माझ्या स्वामीपुढे मायेचा प्रभाव शुन्य होतो. तेव्हा वेळ न घालवता माझ्या स्वामींना शरण या….. अशी साद स्वामीसुत घालताना दिसतात.

आपण ही स्वामीसुतांची ही सत्यवाणी ऐकूण, आपले सर्वस्वी कल्याण साधण्यासाठी पुर्ण परब्रह्म मायाधिपती सर्वेश्वर स्वामी महाराजांना शरण जाऊ या, आणि सच्चितानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे गोड नाम गाऊ या…….

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥

अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

॥ श्री स्वामीसुत महाराज की जय ॥

॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ।।

— सुनिल कनले
sunilkanle@gmail.com

लेखकाचे नाव :
सुनिल कनले
लेखकाचा ई-मेल :
sunilkanle@gmail.com
Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..