कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं,
नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |
नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां,
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१||
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी.
बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते.
या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती असणारी आई जगदंबा कदंब वृक्षाच्या वनामध्ये विचारण, भ्रमण करणारी. मुनिकदम्बकादंबिनीं- मुनी अर्थात ऋषीमुनी. कदंब शब्दाचा दुसरा अर्थ आहे समूह. तर कादंबिनी म्हणजे मेघमाला. ऋषीमुनींच्या समूहाला आपल्या कृपा वर्षावाने तृप्त करणारी मेघमाला.
नितंबजितभूधरां- आपल्या नितंब प्रदेशाच्या गोलाई आणि पुष्टतेने पृथ्वीला जिंकणारी. सुरनितंबिनीसेविताम् – सुर म्हणजे देवता. त्यांच्या नितंबिनी अर्थात सुंदरींच्या द्वारे सेवा केली जात असणारी.
नवंबुरुहलोचनाम् – नव अर्थात नवीनच उगवलेल्या, अंबुरूह म्हणजे कमळाप्रमाणे, लोचन म्हणजे नेत्र असणारी.
अभिनवांबुदश्यामलां- अभिनव अर्थात नवीनच तयार झालेल्या, अंबु म्हणजे पाणी, अंबुद म्हणजे मेघ, श्यामल म्हणजे सावळी. नवीन तयार झालेल्या अर्थात पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे घन:श्याम असणारी.
त्रिलोचनकुटुम्बिनीं- त्रिलोचन अर्थात ज्यांना तीन नेत्र आहेत असे म्हणजे भगवान श्रीशंकर. त्यांची कुटुंबिनी अर्थात सहधर्मचारिणी. त्यांच्यासह संपूर्ण ब्रह्मांडाची संचालिका, असणाऱ्या,
त्रिपुरसुंदरीमाश्रये – श्री जगदंबा त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो. तिच्या चरणकमली शरण जातो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply