नमः शिवाभ्यां वृषवाहनाभ्यां
विरिञ्चिविष्ण्विन्द्रसुपूजिताभ्यां |
विभूतिपाटीरविलेपनाभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ 3 ‖
या विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नमः शिवाभ्यां – परम कल्याणाची अधिष्ठान असणाऱ्या देवी पार्वती आणि भगवान शंकरांना नमस्कार असो.
वृषवाहनाभ्यां – जे वृषभ म्हणजे भगवान नंदीवर, विराजमान आहेत.
इथे एक मजेदार गंमत लक्षात घ्या. आई जगदंबेचे वाहन आहे सिंह. भगवान शंकराचे वाहन आहे नंदी. दोघांचे वेगवेगळे चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा आईचे वाहन वेगळे असते. पण ज्यावेळी एकत्रित चित्र असते, म्हणजे दोघेही एकत्र असतात त्यावेळी वाहन भगवंताचे वापरले जाते.
दोघे मिळून सिंहावर बसलेली आहेत असे चित्रही आपल्याला मिळणार नाही.
( अर्थात ज्या वेळी दोघांना एकत्र जायचे असते ते त्यावेळी पतीचीच वाहन वापरले जाते. हा आपला देखील अनुभव या आद्य दंपती पर्यंत सारखा आहे.)
विरिञ्चिविष्ण्विन्द्रसुपूजिताभ्यां – विरंची म्हणजे भगवान ब्रह्मदेव, विष्णू म्हणजे भगवान श्रीहरी, इंद्र म्हणजे देवराज, इत्यादी समस्त ईश्वर महेश्वरांच्याद्वारे पूजन केले गेलेले,
अन्य समय दोघांचे एकरूपत्व असले तरी ज्यावेळी दोघांच्या शृंगाराचा अर्थात नटण्याचा विचार येतो त्यावेळी मात्र दोघांमध्ये दोन टोकाचे वर्णन पहावयास मिळते. ते वर्णन करताना आचार्यश्री शब्द वापरतात,
विभूतिपाटीरविलेपनाभ्यां – भगवान शंकर विभूती म्हणजे भस्म लावतात. तर देवी पार्वती पाटीर म्हणजे चंदनाचा लेप लावते. एक परम शृंगाराचे तर दुसरे परम वैराग्याचे प्रतीक.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा दोन टोकांना असून देखील एकरूप असणाऱ्या भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply