नमॊ विष्णवॆ वासुदॆवाय तुभ्यम्
नमॊ नारसिंहस्वरूपाय तुभ्यम् ।
नमः कालरूपाय संहारकर्त्रॆ
नमस्तॆ वराहाय भूयॊ नमस्तॆ ॥ १४ ॥
भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत.
येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे.
(हे काही श्लोक सर्वच पाठांमध्ये नाहीत. काही जागी आढळतात काही जागी नाही. मात्र आपल्याला शुद्ध रसपान करायचे असल्याने यांचा आनंद घेऊ.) आचार्य श्री म्हणतात,
नमॊ विष्णवॆ – हे भगवान विष्णू आपल्याला वंदन असो. विष्णू शब्दाचा अर्थच आहे व्यापक. संपूर्ण चराचराला व्यापून असणाऱ्या या तत्त्वाच्या सर्व अवतारात अंतर्गत चैतन्य तेच आहे हे सांगण्यासाठी आचार्य श्री विष्णू या नावाचा उच्चार करतात.
वासुदॆवाय तुभ्यम् – भगवंताचा पूर्णावतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. श्री वसुदेवांच्या पोटी प्रकट झाल्याने भगवंताला वासुदेव असे म्हणतात.
त्या वासुदेवाला नमस्कार असो.
नमॊ नारसिंहस्वरूपाय तुभ्यम् – नरसिंह स्वरूप असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो.
हिरण्यकश्यपूचा वध आणि प्रल्हादा सारख्या शरणागताचे संरक्षण ही भगवंताची प्रिय कार्य या अवतारात दिसतात.
नमः कालरूपाय संहारकर्त्रॆ – कालच स्वरूप धारण करून सगळ्यांचा संहार करणाऱ्या हे भगवंता तुम्हाला नमस्कार असो.
सामान्य अर्थाने भगवान विष्णूंचे कार्य पालन करणे. पण परमेश्वर त्यांना संसारकर्ता म्हटले आहे.
संहार तोच करू शकतो ज्याने निर्माण केले असते. त्यामुळे वेगळ्या शब्दात उत्पत्ती स्थिती लय याचे आपणच कर्ते आहात. असे आचार्य सुचवत आहेत.
नमस्तॆ वराहाय भूयॊ नमस्तॆ – वराह अवतार धारण करणाऱ्या आपल्याला वारंवार नमस्कार असो.
वराहा हा केवळ एक अवतार नाही तर ती एक अवस्था आहे. वर म्हणजे श्रेष्ठ आणि आह म्हणजे ज्याला म्हटल्या जाते. सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान. त्या ज्ञानालाच वराह असे म्हणतात. हे ज्ञान ज्यांचे स्वरूप आहे त्यांना नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply